गुटखा साठा प्रकरण ठरले अडचणीचे
लवकरच नविन जिल्हा प्रमुखाची घोषणा
बीड | वार्ताहर
बीड शहरालगतच्या इमामपूर येथील एका गोदामात पकडलेला गुटख्याचा साठा अन नंतर या प्रकरणात शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा याची शिवसेनेने गंभीर दखल घेतली आहे. खांडे याच्या जिल्हा प्रमुख पदाला स्थगिती दिली असून नविन जिल्हा प्रमुखाची घोषणा लवकरच होणार आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे त्यामुळे आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून कोणाची निवड होणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
गत आठवड्यात केज उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक आयपीएस पंकज कुमावत यांनी नांदुरघाट येथे गुटख्याचा साठा पकडला होता.या प्रकरणाचा तपास सुरू होताच त्याचे धागेदोरे बीड नजीकच्या इमामपूरपर्यंत पोहोचले होते. नंतर या प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह अन्य तिघांवर बेकायदा गुटखा प्रकरणात केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखावरच गुन्हा दाखल झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. राजकीय द्वेषाने आपल्यावर कारवाई झाल्याची प्रतिक्रिया खांडे यांनी व्यक्त केली होती. दुसरीकडे पक्षाने खांडे यांच्यावर कारवाई करुन पक्षाची बदनामी थांबवावी अशी मागणी होत होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर आता कुंडलिक खांडे यांच्या जिल्हा प्रमुख पदाला स्थगिती देण्यात आली असून नविन जिल्हा प्रमुखाची घोषणा लवकरच होणार आहे. ही कारवाई खांडेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Leave a comment