सीएस डॉ.साबळेंसह रूग्णालय प्रशासनाचे कौतूक
बीड । वार्ताहर
जिल्ह्यातील पीकनुकसानीचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी बीड मध्ये दाखल झालेले विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी दुपारी बीड जिल्हा शासकीय रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रूग्णालयातील कोरोना स्वॅब तपासणी प्रयोगशाळेच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच बीड मधील संशयीत रूग्णांचे स्वॅब अंबाजोगाईला न पाठवता ते तात्काळ निदान व्हावे यासाठी बीडच्या प्रयोगशाळेतच तपासावेत अशा सुचनाही जिल्हा रूग्णालय प्रशासनाला दिल्या तसेच रूग्णालय प्रशासनाकडून रूग्णांना दिल्या जाणार्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त करून सीएस डॉ.सुरेश साबळे यांच्यासह त्यांच्या रूग्णालयीन टिमचे कौतुक केले.
गुरूवार आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बीड तालुक्यातील विविध गावांमध्ये जावून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली त्यानंतर दुपारच्या सत्रात आयुक्त केंद्रेकरांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी शर्मा यांच्या समवेत नव्याने रूग्णालयात मंजूर केलेल्या कोरोना स्वॅब तपासणी प्रयोगशाळेची पाहणी करून हि प्रयोगशाळा तातडीने कार्यान्वित करून रूग्णांचे स्वॅब या प्रयोगशाळेतच तपासून त्याचे निदान करावे अशा सुचना दिल्या तसेच जिल्हा रूग्णालयाच्या नुतन ईमारतीच्या बांधकामाविषयी त्यांनी डॉ.साबळेंकडून माहिती जाणून घेतली. आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे दैनंदिन प्रमाण बीड मध्ये चांगले असून या बद्दल त्यांनी जिल्हा आरोग्य विभागाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर्स उपस्थित होते.
Leave a comment