पलायन केलेल्या मुलाला नेकनूर पोलीसांनी पाठलाग करत पकडले
नेकनूर | मनोज गव्हाणे
मुलाकडून चप्पल, काठी आणि मुसळाने झालेल्या मारहाणीत वृद्ध आईचा मृत्यू झाल्याची घटना चौसाळा (ता.बीड) येथे शुक्रवारी (दि.20) रात्री घडली. दरम्यान मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा सकाळी राहत्या घरातच मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात येताच आरोपी मुलाने स्वत:च्या मुलाला सोबत घेत दुचाकीवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नेकनूर पोलीसांना माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे व कर्मचार्यांनी तपास चक्रे गतिमान करत पोलीस वाहनातून आरोपीचा पाठलाग करत त्यास गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन फाट्याजवळ ताब्यात घेतले. या प्रकरणी दुपारी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह आरोग्य केंद्रात हलवण्यात आला.
प्रयागबाई पांडुरंग मानगिरे (70 रा.चौसाळा ता.बीड) असे मयत महिलेच नाव आहे. दारुच्या नशेत मुलगा मदन पांडुरंग मानगिरे (28) याने आई प्रयागबाई यांना शुक्रवारी (दि.20) रात्रीच्या सुमारास चप्पल, काठी आणि मुसळाने मारहाण केली. यामध्ये प्रयागबाई यांचा मृत्यू झाला.दरम्यान मारहाणीत आईचा मृत्यू झाला आहे, ही बाब शनिवारी सकाळी मदनच्या लक्षात येताच त्याने घरातून स्वत:च्या लहान मुलास घेवून दुचाकीवरुन पळ काढला. बीड-गेवराई मार्गे तो महाकाळा येथे सासरवाडीत पोहचला. तिथून तो अन्य ठिकाणी फरार होणार होता, याची माहिती नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांना मिळताच त्यांनी शहागड येथून संशयित आरोपी मदन यास ताब्यात घेतले. तसेच एक दुचाकीही ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस पुढील तपास करत आहेत. आरोपी मदन मानगिरे यास एक मुलगा, एक मुलगी असून तो वडील आणि त्याची आई एकत्र राहत होते. मदनची पत्नी त्याच्या सोबत राहत नाही. अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
उत्तरीय तपासणीनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
पोलीसांच्या प्राथमिक तपासानुसार, मयत महिला व तिचा मुलगा यांच्यासह कुटूंबातील काहीजण मद्यपान करण्याच्या सवयीचे आहेत. पैशाच्या कारणावरुन तसेच नातवाला वेळेवर जेवण का देत नाहीस या कारणावरुन मयत प्रयागाबाई व तिचा मुलगा मदन यांच्यात वाद झाला. त्यातूनच त्याने आईला चप्पल, काठी आणि मुसळाने मारहाण केली. यातच प्रयागाबाईचा मृत्यू झाला असावा. दरम्यान उत्तरीय तपासणी अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी दिली.
Leave a comment