दादा वाढदिवसाची बीडकरांना भेट द्या

आठ महिन्यांपासून बीड शहर अंधारात; नगराध्यक्षांना ना सोयर ना सुतक!

बीड । वार्ताहर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलांवरुन सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. बिलांची तपासणी करुन त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी (रिकन्सिलेशन) संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने 15 ऑगस्टपर्यंतच्या कालमर्यादेत अहवाल सादर करावा. या समितीचा अहवाल येईपर्यंत ग्रामीण तथा स्थानिक व नागरी स्वराज्य संस्था पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची वीज देयकांची वसुली व वीजतोडणी तोपर्यंत थांबवावी. यापूर्वी तोडलेल्या वीज जोडण्या तातडीने पूर्ववत कराव्यात, असा निर्णय अजित पवार यांनी काल झालेल्या बैठकीत घेतला होता. आज अजित पवारांचा वाढदिवस आहे. त्यामुळे अजित पवारांनी बीडकरांना आपल्या वाढदिवसाची भेट द्यावी. बीड न.प.चे रूपांतर ग्रामपंचायतमध्ये करावे म्हणजे चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून पैसे मिळतील आणि महावितरणची बाकी भरता येईल. अन् त्यामुळे तरी बीडमध्ये पथदिवे सुरू होतील. आठ महिन्यापासून पथदिवे बंद असलेल्या बीडकरांना दिलासा मिळेल. या कामी पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आ.संदिप क्षीरसागर यांनी अजित पवारांकडे ही वाढदिवसाची भेट मागावी अशी अपेक्षा बीडकरांनी व्यक्त केली आहेत.
बीड शहर जवळपास गेल्या आठ महिन्यापासून म्हणजे मागच्या लॉकडाऊनपासून अंधारात आहे. गेल्या काही दिवसात काही भागातील पथदिवे सुरु केले गेले, मात्र आठवडाभरानंतर ते ही बंद झाले. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. रस्त्यावर पाणी साचले की खड्डे दिसत नाहीत, नाल्याही दिसत नाहीत, त्यामुळे खड्ड्यात आणि नाल्यात पडून अनेकांचे कंबर निकामी झाले आहेत. आठ महिन्यांपासून शहर अंधारात असताना नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांना याचे काहीही सोयरसुतक नाही. महावितरणच्या अधिकार्‍यांनी अढेलपणाची भूमिका घेतली आहे. निदान नगरपालिकेने तरी शहरातील राहिवाशांसाठी काहीतरी करुन पथदिवे सुरु करणे आवश्यक होते, मात्र नगराध्यक्ष महाशयांनी देखील सर्व काही महावितरणवर सोडून दिले. नागरिक मात्र अंधारात हालअपेष्ठा सहन करत आहेत. गेल्या आठवड्यात नगरसेवकांनीही नाटक केले. त्यांचे नाटकही उघडे पडले. कुठेही पथदिवे सुरु झाले नाहीत.

महावितरणची नगरपालिकेकडे 20 कोटीपेक्षा जास्त थकबाकी असल्याने महावितरणने गेल्या आठ महिन्यांपूर्वी नगरपालिकेच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केला. हे पथदिवे सुरु होण्यासाठी सुरुवातीला प्रयत्न केले गेले, परंतु पैसे भरल्याशिवाय पथदिवे सुरु होणार नाहीत, असे ज्यावेळी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनीच थेट नगराध्यक्षांना निरोप पाठवल्यानंतर नगराध्यक्षांनी याकडे दुर्लक्ष केले.चार वर्षापासून एलईडी लाईट लावले त्यामुळे 40 टक्के बील कमी करा अशी मागणी नगरपालिकेकडून करण्यात आली. त्यावरही महावितरणने कसलीही कारवाई केली नाही. महावितरणच्या अधिकार्‍यांनी पैसे भरा अन् मग बोला अशी भूमिका घेतली होती. बीड न.प.चे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनीदेखील या प्रकाराकडे हतबलता दाखवून दुर्लक्ष केले. मध्यंतरी काही नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालावे अशी मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी महावितरण व नगरपालिकेच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. बील भरण्याचा रोडमॅप ठरला. मात्र पुढे काही झाले नाही. नंतर नगराध्यक्षांच्या जवळच्या नगरसेवकांनी आम्ही कारभारी आहोत हे दाखवण्यासाठी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यासोबत निवेदनाचे फोटोसेशन केले. वृत्तपत्रांमध्ये ते फोटो छापून आणले. आम्ही जनतेसाठी काही तरी करत आहोत, हे दाखवण्यासाठी त्यांचे ते नाटक होते. ते नाटकही उघडे पडले. आठ महिन्यापासून शहर अंधारात आहे. आता नागरिकांनीच वर्गणी करुन नगरपालिकेचे वीजबील भरण्याची वेळ आली आहे. यामध्ये काही चांगल्या लोकांनी पुढाकार घेवून सर्वसामान्य आणि गोरगरिब लोकांच्या व्यवस्थेसाठी रात्री-अपरात्री, पावसात, सायकलवर, मोटरसायकवर जाणार्‍या लोकांसाठी वीज पुरवठा पुन्हा सुरु होवून पथदिवे पुन्हा कसे सुरु होतील यासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे.

अध्यक्षसाहेब,आता तरी लक्ष घाला

गेल्या आठ महिन्यापासून शहर अंधारात असून काही भागात आता पथदिवे सुरू झाले आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत, शहरातील नागरीक जीव मुठीत धरून रात्री अपरात्री वाहन चालवित आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी आता तरी लक्ष घालून शहरातील पथदिव्यांचा आणि रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी माफक अपेक्षा शहरवासियातून व्यक्त होत आहे.

शिवसेना कुठे आहे?

शिवसेनेचे सत्ता असूनही शहरात जर लाईट नसतील तर शिवसेना स्टाईलने महावितरणच्या अधिकार्‍यांना पथदिवे सुरु करण्यास भाग पाडायला हवे होते. विशेष म्हणजे नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची आघाडी आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांना बोलले तरी पथदिवे सुरु व्हायला हवेत, पण बोलेल कोण? क्षीरसागरांना विरोध म्हणून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेतील काही पदाधिकारी पथदिवे बंद असण्यात आनंद मानत असतील तर हे दुर्देव कोणाचे? सत्ता असूनही शिवसेना कोठे आहे? असा प्रश्न शहरवासिय विचारित आहेत.

एमआयएमचे शफीकभाऊंची चमकोगिरी कशासाठी?

शहरातील पथदिवे सुरु व्हावेत, यासाठी वर्तमानपत्रामधून सातत्याने बातम्या प्रकाशित झाल्या. पथदिवे सुरु झाले नाही तर आंदोलन केले जाईल असा इशारा एमआयएमचे अ‍ॅड.शेख शफीक यांनी दिला होता, मात्र हा इशारा केवळ बातम्या छापून येण्यापूरताच होता. शफीकभाऊंची चमकोगिरी कशासाठी? पथदिवे तर सुरु झाले नाहीत, आणि ते सुरु झाले की नाही हे पुन्हा शफीकभाऊंनी पाहिले नाही. केवळ नगरपालिकेच्या निवडणूकीवर डोळा ठेवून पत्रकबाजी करुन मते मिळणार का? अशी चर्चाही होवू लागली आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.