बीड,मांजरसुंबा, पाली, कपिलधारमध्ये जिल्हाधिकार्यांची कारवाई
बीड । वार्ताहर
गेल्या काही दिवसांपासून बीडसह इतर तालुक्यांतही कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतानाच केवळ नावालाच निर्बंध असल्याचे चित्र निर्माण झाले होते. सर्वकाही सुरु असताना प्रशासनाने मात्र झोपेचे सोंग घेतले होते, पोलीस प्रशासनदेखील औपचारिकता म्हणून याकडे पाहत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली होती. प्रशासनाकडे थेट तक्रारी जावू लागल्यानंतर झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन जागे झाले. प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी बीड तहसीलदार वमनेंच्या नाकावर टिच्चून शहरासह बीड तालुक्यातील हॉटेल, धाबे आणि दुकानांवर कारवाई केली. खरे तर ही जबाबदारी तहसीलदार वमनेंची होती, मात्र ते काहीच करत नाहीत म्हणून जिल्हाधिकार्यांना बाहेर पडावे लागले असेही प्रशासनात बोलले जावू लागले आहे. जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी अन्विता हॉटेलसह इतर हॉटेलमध्येही जावून तपासणी केली तसेच मांजरसुंबा, कपिलधार,पालीमध्ये देखील हॉटेल हरियाणा धाबा, कन्हैया आदी हॉटेलवर दंडात्मक कारवाया केल्या. यामुळे रविवारी शहरात आणि परिसरात बर्यापैकी बंद पाळला गेला.
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्या हॉटेल, ढाबे, व्यावसायिक आणि नागरिकांवर प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी कारवाई केली. त्यांनी रविवारी (दि.18) बीड शहर, मांजरसुंबा, पाली, कपिलधार आदी ठिकाणी अचानक पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर मोठ्या प्रमाणात थेट दंडात्मक कारवाई केली. यामध्ये मांजरसुंबा येथील कन्हैया ढाबा आणि पाली येथील हरियाणा हॉटेल यांच्यावर प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. ्रयाच बरोबर समनापुर येथील हॉटेल नक्षत्र, हॉटेल जायका आदी ढाबे आणि हॉटेल्सवर दहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
रविवारी दुपारी जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी कपिलधार येथील येथे भेट दिली. निर्बंध लागू असताना देखील पर्यटनासाठी गर्दी केलेल्या आणि कोणत्याही नियमांचे पालन न करणार्या व्यक्ती तसेच सुरू असलेल्या विविध व्यावसायिक दुकाने यांचा वर कारवाई केली. कोरोना संसर्ग नियंत्रणात राखण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे नागरिकाने त्यांनी पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी केले.यावेळी ते म्हणाले,कोरोना साथीचा धोका टळलेला नाही. यासाठी लागू केलेल्या नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्ण संख्या वाढत आहे.मास्कचा वापर करणे सामाजिक आंतराचे पालन करणे आदी विविध बाबींचे पालन केले जाणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नागरिक आणि व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे येथून पुढे नियमभंग करणार्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणारे करणार्यांवर दंडात्मक कारवाई करून न थांबता गुन्हे दाखल केले जातील असे जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले.यापूर्वी बीड शहरातील कोरोना बाबतच्या नियमांचे उल्लंघन करणार्या दुकाने व आस्थापनांवर कारवाई केली. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, संबंधित क्षेत्रीय अधिकारी महसूल आणि पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मंडल अधिकारी इंगोले, साळुंखे, पोलिस अधिकारी रोडे यासह विविध अधिकारी यांनी कारवाईत सहभाग घेतला.
भाजी मंडईतील विक्रेते विनामास्कच
बीड शहरातील नव्या भाजीमंडईत भाजीपाला, फळ विक्रीसाठी विविध भागातून येणार्या विक्रेत्यांनाही निर्बंध शिथील होताच कोरोनाचा विसर पडला आहे की काय? असे चित्र दररोज दिसून येत आहे. बहुतांश विक्रेत्यांकडून तोंडाला मास्क बांधला जात नाही, सामाजिक अंतर तर कोणीच पाळत नाही, मात्र तोंडावर मास्क लावण्याचे भानही या विक्रेत्यांना नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त झाली आहे. या विक्रेत्यांकडे बीड शहरातील विविध भागातील नागरिक भाजीपाला, फळे खरेदीसाठी येत असतात, विक्रेतेच कोरोनाच्या नियमाला बगल देत असल्यामुळे कोरोनाचा प्रसार व्हायला फार वेळ लागणार नाही. बीड नगरपालिका आणि तहसील प्रशासनाने भाजीमंडईत येवून एकदा तरी याची पाहणी करुन विनामास्क भाजीपाला, फळे विकी करणार्यांवर कारवाई करण्याची गरज आहे, तरच नियमांचे पालन होवू शकते.
जिल्हाधिकार्यांनी मोंढ्यातही अचानक चक्कर मारावी
बंद कालावधीमध्येदेखील बीड शहरातील आणि मोंढ्यातील अनेक दुकाने राजरोसपणे चालू असतात. जे नियम पाळतात, त्यांच्यावर विनाकारण अन्याय होत असल्याची भावनाही यामुळे निर्माण होते. जिल्हाधिकारी ठोंबर यांनी बंद कालावधीत अचानक मोंढा आणि शहरातील इतर भागातही जरा चक्कर मारावी, म्हणजे खरी परिस्थिती त्यांच्या लक्षात येईल, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
Leave a comment