समाजाचे नेतृत्व धसांकडे गेले
बीड । वार्ताहर
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे. कालच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची पुर्नविलोकन याचिका फेटाळल्याने या आरक्षणाचा तिढा आणखीनच वाढला आहे. आता केंद्र सरकारने आरक्षणासंबंधी वटहुकूम काढावा अशी मागणी खा.संभाजीराजे यांनी केली आहे. दरम्यान यापुढे आरक्षणासाठी मोर्चा काढून उपयोग होणार नाही. मात्र केवळ राजकारणाचा भाग म्हणून बीडमध्ये शिवसंग्रामचे नेते आ.विनायक मेटे आणि आ.सुरेश धस यांनी दोन वेगवेगळे मोर्चे काढले. यामध्ये आ.सुरेश धस यांनी दणका मोर्चा काढल्याने मेटेंनी काढलेल्या मोर्चाची हवा गुल झाली. त्याचबरोबर जिल्ह्यातील मराठा समाजाचे नेतृत्व आपसुकच आ.सुरेश धस यांच्याकडे गेले आहे. गेल्या काही वर्षात समाजाचे नेतृत्व करणारा एकही पुढारी जिल्ह्यात नव्हता. आ.धस यांच्या माध्यमातून समाजाला एक कडवा नेता मिळाला आहे. कारण आ.सुरेश धस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करतानाच ओबीसी आरक्षणासंदर्भात टिका केली होती. एवढेच नव्हे तर मंत्री वड्डेटीवार यांना लक्ष केले होते.
मराठा आरक्षण सवोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर महिनाभरात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय आणि सामाजिक मंथन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांची झालेली गळाभेट ही सर्वात मोठी घटना समजली गेली. त्यातून काहीतरी चांगलेच पुढे येणार आहे. आरक्षणासंदर्भात खा.संभाजीराजे यांनी पुण्यातील बैठकीमध्ये जे विचार मांडले होते, ते समाजाला रुचले होते. मोर्चे काढून उपयोग नाही हा प्रश्न आता केंद्र सरकारच्या अख्यत्यारित आहे हे त्यांनी समाजाच्या लक्षात आणून दिले होते. राज्यातील समाजाचे नेतृत्व करण्याची धमक छत्रपती संभाजीराजे यांच्यामध्ये असल्याची भावना त्यावेळी व्यक्त केली गेली होती. मात्र त्यांच्या भूमिकेबद्दल टिका करुन शिवसंग्रामचे नेते आ.विनायक मेटे यांनी बीडमध्ये मोर्चा काढला. केवळ राजकीय हेतूने प्रेरित होवून आणि राजकीय स्वार्थासाठी हा मोर्चा काढल्याचे नंतर राज्यभर चर्चिले गेले. गेल्या काही दिवसांपूर्वीच स्थानिक स्वराजचे आ.सुरेश धस यांनीही मराठा आरक्षणाचा प्रश्न हाती घेवून मोर्चा काढला. भाजपा आणि सुरेश धस मित्रमंडळ मोर्चाचे संयोजक असल्याचे दर्शवले गेले. मात्र हा मोर्चा केवळ सुरेश धस यांनीच काढल्याचे नंतर स्पष्ट झाले. कारण आ.लक्ष्मण पवार वगळता भाजपचा कोणीही पदाधिकारी मोर्चामध्ये सहभागी झाला नव्हता. मात्र सुरेश धस यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने मोर्चा काढल्याने आ.मेटेंपेक्षा मोठा मोर्चा काढल्याची चर्चा त्यावेळी झाली. गेल्या आठवडाभरात या मोर्चाची चर्चा सुरु असून मेटेंच्या मोर्चाची चर्चा बंद झाली आहे. मराठा समाजाचे नेतृत्व करण्याची धमक आपल्यामध्ये असल्याचे सुरेश धस यांनी वारंवार स्पष्ट करुन दाखवले आहे. मोर्चाला झालेली गर्दी पाहता समाज सुरेश धस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल असेच चित्र निर्माण झाले आहे. आ.विनायक मेटे यांनी गेल्या काही वर्षात आरक्षणाचा प्रश्न चांगलाच मनावर घेतला मात्र त्यातून निष्पन्न काहीच झाले नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातही चांगलेच रणशिंग फुंकले आहे. मात्र त्यालाही कोठेच समाजातून आधार मिळत नसल्याचे चित्र आहे. मुंबई-पुण्यात बसून प्रसारमाध्यमांसमोर बोलायचे एवढाच उद्योग अलिकडे आ.विनायक मेटे यांनी सुरु केला आहे. त्याचा थेट समाजाला काय फायदा असा सवालही समाजातीलच तरुणामधून केला जात आहे.एकंदरीतच मराठा आरक्षणावरुन जिल्ह्यात आता चांगलेच राजकारण सुरु झाले आहे. त्यामध्ये आ. सुरेश धस यांनी बाजी मारल्याचे बोलले जात आहे.
Leave a comment