गुन्हा दाखल करण्यासाठी नातलगांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
गेवराई । वार्ताहर
शहरातील सिद्धीविनायक नगर भागामध्ये राहणार्या एका विवाहितेला दहा दिवसांपूर्वी विष पाजून खून करण्याचा प्रयत्न केला गेला. औरंगाबाद येथे उपचार त्या महिलेवर सुरु होते मात्र सायंकाळी तिचा मृत्यू झाल्यानंतर तिचे आई वडील आणि भावानी तिचा पती,दीर, सासू-सासरे यांनीच तिला विष पाजून मारल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. तक्रार दिल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणार्या पोलीस यंत्रणेसमोर नातेवाईक अधिकच आक्रमक झाले या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली असून गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी ठिय्या मांडला होता.
एका विवाहीत महिलेचा तिचा नवरा, सासू, सासरा, दिरानी मिळून शारिरीक व मानसिक छळ करून तिला बळजबरीने विष पाजल्याची घटना गेवराई येथील सिद्धीविनायक कॉलनीत घडली असून, शुक्रवार ता. 25 रोजी सकाळी सात वाजता सदरील महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, सासरच्या लोकांविरोधात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी करून महिलेच्या नातेवाईकांनी गेवराई पोलीस ठाण्या समोर मुलीचा मृतदेह ठेवून ठिय्या दिला. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष बाब म्हणजे, महिलेचा मृत्यू होताच नवरा व अन्य लोकांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
कांचन(कविता)विशाल राठोड, (वय,26) रा. सिद्धीविनायक नगरमध्ये तिच्या सासरी राहत होती. कोणत्या तरी कारणावरून सासरचे लोक तिचा मानसिक, शारीरिक त्रास देऊन छळ करीत होते. 10 जून रोजी तिला बळजबरीने नवरा, सासू, सासरे आणि दिराने मिळून तिला विष पाजले. अत्यवस्थ अवस्थेत तिला गेवराई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू , प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिचा गुरूवार ता. 24 रोजी सकाळी सात वाजता मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू होताच, तिचा नवरा, सासू, सासरे व दिराने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, शुक्रवार ता. 25 रोजी महिलेच्या नातेवाईकांनी गेवराई पोलीस ठाण्यात मृतदेह आणून ठिय्या दिला. जोपर्यंत खूनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, अशी कठोर भूमिका घेतल्याने, काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीसांनी शांततेची भूमिका घेऊन प्रकरण हाताळले. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती
Leave a comment