निविदा प्रक्रिया न करताच दीड कोटींचे जम्बो सिलेंडर खरेदी

बीड । वार्ताहर

कोरोना संसर्गामधील दुसरी लाट आता काहीशी शमली असून तिसरी लाट येण्याची चर्चा सुरु झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तिसर्‍या लाटेची संभाव्य शक्यता व्यक्त केली आहे. या लाटेत लहान मुलांवर संसर्गाचा धोका जास्तीत जास्त होवू शकतो अशी भिती व्यक्त होत आहे. आगामी सप्टेंबर,ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येण्याचे संकेतही जागतीक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील गेल्याच आठवड्यात संवाद साधताना तिसर्‍या लाटेची भीती व्यक्त केली आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात आगामी काळात रुग्णांची तारांबळ होवू नये म्हणून वैद्यकीय उपकरणे खरेदीची लगबग सुरु असून निविदा प्रक्रिया न करताच दिड कोटीचे ऑक्सीजन खरेदीचा निर्णय घेण्यात आला असून आदित्य एंटरप्रायजेस नावाच्या संस्थेला ही ऑर्डर देण्यात आली आहे. जम्बो ऑक्सीजन खरेदीमध्ये राजकीय हस्तक्षेपाचा वास येत असून डॉ.सुरेश साबळे हे देखील डॉ.सूर्यकांत गित्तेंप्रमाणे डोळे झाकून सह्या करतात की काय? अशी चर्चा होवू लागली आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढला होता. तो अजुनही कमी होण्याचे नाव घेत नाही. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी मृत्यूदराचा आलेख वाढताच आहे. दुसर्‍या लाटेमध्ये जिल्हा रुग्णालय, स्वाराती, लोखंडी सावरगाव, उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन तुटवड्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. त्यासाठी ऑक्सीजन प्लाट उभारणीचा निर्णयही घेण्यात आला. बीड जिल्हा रुग्णालयात लिक्विड ऑक्सीजन प्लान्टही कार्यान्वीत आहे. पहिल्या लाटेनंतर दुसर्‍या लाटेपूर्वी मोठ्या प्रमाणात जम्बो ऑक्सीजन सिलेंडर खरेदी करण्यात आले होते. त्यावेळी विविध साहित्य खरेदी करण्यासाठी निविदाही काढण्यात आल्या होत्या. तिसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा रुग्णालय, स्वाराती आणि इतर रुग्णालयांना लागणारे साहित्य गृहित धरुन खरेदी करण्यात येत असून बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.साबळे यांनी नव्याने 500 जम्बो सिलेंडर खरेदी करण्यासाठी शहरातील आदित्य एंटरप्रायजेस या संस्थेला 18 जून रोजी पुरवठा आदेश दिला आहे. या सिलेंडरची किमत 1 कोटी 19 लाख 99 हजार 500 रुपये असून यासोबत इतर उपकरणांच्या खरेदीसाठी 5 लाख रुपयांचा आदेश देण्यात आला आहे. 50 लाखांपर्यंतच्या खरेदीसाठी जिल्हाधिकार्‍यांना आदेश आहे. मात्र त्यावरील खरेदीसाठी निविदा प्रक्रिया करुन आणि शासनाची परवानगी घेवून खरेदी करावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत. 18 जून रोजी आदित्य एंटरप्रायजेसला जो पुरवठा आदेश दिला आहे, तो कुठलीही निविदा प्रक्रिया न करता स्थानिक पातळीवर खरेदीच्या अधिकारात ही खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय प्रशासनाने निविदा प्रक्रिया का केली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

यापूर्वीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांच्या कार्यकाळातही अशा प्रकारची खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांच्यावर टिका झाली होती. नव्याने आलेले डॉ.सुरेश साबळे यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला मात्र खरेदीमध्ये डॉ.सूर्यकांत गित्तेंचाच कित्ता ते गिरवत आहेत की काय? अशी शंका या निमित्ताने घेण्यात येवू लागली आहे. जम्बो सिलेंडर खरेदी करणे आवश्यक आहेत, मात्र त्यासाठी सर्व नियम पायदळी तुडवून खरेदी कशासाठी असा सवालही करण्यात येत आहे.

पालकमंत्री मुंडे, आ.संदीप क्षीरसागर जरा लक्ष द्या

जिल्हा रुग्णालयात पहिल्या लाटेपासून कोव्हीड अंतर्गत मोठया प्रमाणात खरेदी सुरु आहे. आवश्यक त्या गोष्टी खरेदी कराव्याच लागतात. परंतु जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख जिल्हाधिकारी असल्याने त्यांच्या मंजूरीनेच ही खरेदी असते मात्र काही बाबतीत जिल्हा रुग्णालयातूनच मोठ्या प्रमाणातूनच मास्क, पीपीई कीट खरेदी केले गेले आता दीड कोटींचे जम्बो सिलेंडर निवीदा प्रक्रिया न करताच खरेदी केले गेले आहेत. त्यामुळे हा प्रकार नियमाला धरुन आहे का हे पाहण्याची जबाबदारी निश्चितच पालकमंत्री धनंजय मुंडे, आ.संदीप क्षीरसागर यांची आहे त्यामुळे त्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.