नुतन सीएस डॉ.साबळेंनी केली रुग्णांची तपासणी

बीड । वार्ताहर

शहरातील नाळवंडी रोडवरील स्थलांतरित रुग्णालयात डॉक्टर हजर राहत नसल्याच्या तक्रारी नव्या नाहीत. सोमवारी स्वत: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळेंनीच याचा अनुभव घेतला. उपचारासाठी आलेले रुग्ण डॉक्टरांची वाट पाहत ताटकळत बसलेले होते, मात्र एकही डॉक्टर वेळेत हजर झाला नाही, अखेर डॉ.साबळे यांनीच स्थलांतरित रुग्णालयात धाव घेत रुग्णांची स्वत: तपासणी केली. दरम्यान बेशिस्त आणि उशिराने रुग्णालयात दाखल झालेल्या डॉक्टरांची सुनावणी करत डॉ.साबळेंनी पहिली वेळ म्हणून तोंडी सूचना केल्या,शिवाय असेच पुन्हा निदर्शनास आल्यावर थेट कारवाई करणार असल्याचा इशारा दिला.त्यामुळे मनमानीपणा करणार्‍या डॉक्टरांची तारांबळ उडाली होती.

 

रुग्ण सुविधा देण्याकडे चालढकलपणा करण्याचे प्रकार जिल्हा रुग्णालयात यापूर्वीही घडलेले आहेत. याचीच प्रचिती सोमवारी नुतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.साबळेंनाही आली. त्यांनी सोमवारी सकाळी पुन्हा एकदा स्थलांतरित जिल्हा रुग्णालयाला भेट देत डॉक्टर वेळेवर हजर झाले की, नाही याची पाहणी केली,  परंतु बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टर उशिराने रुग्णालयात येत असल्याचे त्यांना दिसून आले, शिवाय डॉक्टरांची वाट पाहत काही रुग्ण कक्षाबाहेर ताटकळत बसले होते, यावेळी डॉ.साबळेंनी स्वत: स्त्री रोग विभागात रुग्ण तपासणीला सुरुवात केली. पाच रुग्ण तपासणी झाल्यावर येथील महिला डॉक्टर धावत आल्या. सीएस डॉ.साबळे स्वत: ओपीडीत बसल्याची माहिती वार्‍यासारखी पसरल्यानंतर सर्वच डॉक्टर धावत कक्षात दाखल झाले. दरम्यान मेडिसीन ओपीडीत फिजिशियन नव्हते, तर कंत्राटी डॉक्टर होते. याच डॉक्टरवर वॉर्डमधील रुग्ण तपासणीची जबाबदारी होती. संपर्क केल्यानंतर डॉ. मुळे धावत आले. त्यांनी ओपीडीत बसून रुग्ण तपासले. प्रसुती विभागात तपासणी करताना एक महिला गंभीर होती. यावर डॉ. साबळे हे स्त्री रोग तज्ज्ञ, परिचारिका यांना सोबत घेऊन तात्काळ कक्षात गेले. 20 मिनिट तपासणी करुन तिला सिझरला घेण्याचे सांगितले.

डॉ.साबळेंकडूनही दांडीबहाद्दरांना नोटीस नाही

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी ’सरप्राईज व्हिजिट’ देण्यासाठी स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात जाताना शासकीय वाहन नेले नाही. खासगी वाहनाने ते रुग्णालयात पोहोचले तेव्हा तेथील कारभार कसा रामभरोसे सुरु आहे हे देखील त्यांनी पाहिले;पण दांडीबहाद्दर डॉक्टरांना नोटीस बजावून खुलासे मागविण्याऐवजी केवळ तोंडी सूचना देऊन कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.आठवडाभरापूर्वीच आरोग्य उपसंचालकांनी स्थलांतरित रुग्णालयात भेट देऊन तंबी दिली होती मात्र यानंतरही येथील कारभार ’जैसे थे’च आहे. त्यामुळे डॉ. साबळेंना सूचनाच द्यायच्या होत्या तर सरप्राईज व्हिजिटचा दिखावा कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रक्तदात्यांच्या सत्कार

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी विभागामध्ये नियमित रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले.

आरोग्य संस्था प्रमुखांशी आढावा बैठक

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी सोमवारी दुपारी 3 वाजता कोव्हिड रुग्णसेवेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था प्रमुखांची जिल्हा रुग्णालयात बैठक घेतली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांच्यासह अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील  सर्व आरोग्य संस्थानी कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर देण्याबाबत तसेच, नॉन कोविड रुग्णालयातील आरोग्य सुविधा सुरळीत करण्याबाबत सुचना देण्यात आल्या

 

सहा महिन्यानंतर जिल्हा रूग्णालयात शस्त्रक्रिया सुरू

कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने या रुग्णांनाच बेड अपुरे पडू लागल्याने जिल्हा रुग्णालयात होणार्‍या हार्निया, पेंडेक्स, गचकरण, गाठ, हाडाच्या संदर्भातील सर्वच शस्त्रक्रिया मागील सहा महिन्यांपासून बंद होत्या. आता कोरोना रुग्णांची संख्या घटू लागल्याने सोमवारी (दि.14) सकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी आढावा घेऊन शस्त्रक्रिया सुरू करण्याच्या सुचना केल्या. सोमवारी याला सुरूवातही झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान शस्त्रक्रिया सुरु झाल्याने सर्वसामान्यांचा आर्थिक भुर्दंड वाचणार आहे.
जिल्हा रूग्णालयात विविध शस्त्रक्रिया मोफत केल्या जात होत्या. परंतू कोरोनाचे रूग्ण वाढल्याने या सर्व शस्त्रक्रिया बंद पडल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांना शस्त्रक्क्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल व्हावे लागत होते. नुतन जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा कारभार हाती घेतााच डॉ.सुरेश साबळे यांनी यंत्रणा कामाला लावली. प्रसुती, मेडिसीन, लॅब आदी संदर्भातील सर्व सुविधा देण्यासह शस्त्रक्रिया करण्याच्या सुचना केल्या. सर्जन डॉ.माजीद यांना रूग्णांना परत न पाठविता शस्त्रक्रिया करण्यास सांगताच एका रूग्णाची तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. आता यापुढे नियमित छोट्या व मोठ्या शस्त्रक्रिया हळूहळू सुरू केल्या जाणार असल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत सीएस.डॉ.साबळे म्हणाले, जिल्हा रूग्णालयाबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. शिवाय सामान्यांना सेवा आणि सुविधा देण्यासाठी आमची यंत्रणा सक्षम केली जाईल.ओपीडीतील रूग्णसंख्या वाढविण्यासह शस्त्रक्रिया सुरू करण्याच्या सुचना केल्या आहेत.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.