लुखेगावच्या सरपंच हजिराबी पठाण यांच्याशी थेट मुख्यमंत्र्यांचा संवाद
बीड । वार्ताहर
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेला थोपवून दोन्ही लाटेत गावात एकही रुग्ण आढळून न आलेल्या माजलगाव तालुक्यातील लुखेगावच्या महिला सरपंच हजिराबी कडेखान पठाण यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंशी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत कोरोनामुक्तीचा लुखेगाव पॅटर्न सांगितला. मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकासमंत्री, राज्यमंत्री व वरिष्ठ अधिकार्यांनी हजीराबी यांनी केलेल्या कामाचे टाळ्या वाजवून कौतुक करत त्यांना दाद दिली. दरम्यान सीइओ अजित कुंभार यांनी सरपंच, ग्रामसेवकांचा सत्कार केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी राज्यातील कोरोनामुक्त ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी संवाद साधला. त्यांच्याकडून ग्रामपंचायतींच्या कोरोनामुक्तीचे मॉडेल जाणून घेतले. बीड जिल्ह्यातून माजलगाव तालुक्यातील लुखेगावची यासाठी निवड केली गेली होती. हजीराबी पठाण या सरपंच आहेत तर महेश गेंडले हे ग्रामसेवक आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसीमधून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
हजिराबी म्हणाल्या, माझ्या गावची लोकसंख्या 780 आहे. गावात अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. बाहेर गावाहून येणार्या व्यक्तींना आम्ही आधी गावात विलगीकरणात ठेवले. नंतर त्यांची तपासणी केली आणि मगच घरी पाठवले. गावात आम्ही तरुणांची समिती स्थापन केली. गावात प्रवेशबंदी करुन अंमलबजावणीची जबाबदारी तरुणांवर दिली त्यामुळे बाहेरगावाहून विनाकारण येणार्यांना चाप बसला. गावातील सर्व धार्मिक स्थळे बंद केली आणि धार्मिक कार्यक्रम बंद केले. सर्वधर्मियांनी यासाठी सहकार्य केले. अगदी ईदच्या वेळीही एमकेकांच्या घरी जाणे आम्ही टाळले. गावकर्यांच्या सहकार्याने आम्ही कोरोनाला दूर ठेऊ शकलो. प्रशासनाच्या सूचनांचे पालन केल्याने हे शक्य झाले.
प्रवेशबंदीसाठी लग्नही ऑनलाइन
लुखेगावाच्या मुलाचे औरंगाबादच्या मुलीशी लग्न होणार होते मात्र आम्ही बाहेरच्यांना गावात प्रवेशबंदी केली होती. त्यामुळे लग्नही ऑनलाइन पद्धतीने व्हिडीओ कॉलवर लावले गेल्याचे हजीराबींनी सांगितले.
लस घेऊन दिले प्रोत्साहन
हजीराबी 60 वर्षांच्या आहेत. लसीकरण सुरु होताच त्यांनी गावकर्यांना लस घेण्यासाठी आवाहन केले. स्वत: सर्वात आधी लस घेत गैरसमज अफवांना पूर्णविराम दिला. यामुळे गावात चांगल्या प्रकारे लसीकरणही झाले आहे.
Leave a comment