आयसोलेशनमधील रूग्णांची आस्थेवाईपणे चौकशी
परळी । वार्ताहर
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत परळी व शांतीवनच्या सहकार्याने शिरूर कासार येथे कोरोना बाधितांसाठी सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरला मंगळवार व बुधवारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी भेटी देऊन तेथील रूग्ण व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी रूग्णांचीही आस्थेवाईपणे विचारपूस केल्याने रूग्णांचे मनोबल वाढले.
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि शांतीवन,आनंदवन यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर येथे सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरला काल पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी भेट दिली व रुग्णांशी संवाद साधला.आयसोलेशन सेंटरमध्ये उपचार घेणार्या रुग्णांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ मिळावे हा आमचा प्रयत्न असल्याचे पंकजाताई यावेळी म्हणाल्या.इथे मिळणार्या सोयी सुविधांबद्दल रुग्णांनी समाधान व्यक्त केले,त्यांच्या चेहर्यावरील आनंदी छटा आत्मिक समाधान आणि ऊर्जा देणार्या होत्या.कोरोनाच्या संकटात परळीकरांची सेवा करण्यासाठी आयसोलेशन सेंटरच्या माध्यमातून आम्ही ‘सेवा यज्ञ’ आरंभिला आहे. या अंतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे.रुग्णांना सकस आहार आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी नित्य योगाभ्यास घेतला जातो.आयसोलेशन सेंटर मधील उपचार आणि सोयीसुविधांमुळे अनेक रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी जात आहेत असे त्या म्हणाल्या. रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचार्यांशी देखील संवाद साधला.
स्वतः तयार केले जेवणाचे डबे
पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई यांनी बुधवारी सकाळी परळीच्या सेंटरला भेट देऊन रूग्णांची आस्थेवाईपणे विचारपूस केली. आहेत.तत्पूर्वी रुग्णांच्या भोजन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी स्वयंपाक गृहाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.याप्रसंगी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना देण्यात येणारे जेवणाचे डबे त्यांनी स्वतः तयार करून दिले.
Leave a comment