बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. त्यामुळे अॅलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. कुलाबा वेधशाळेने हा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
शेतात काम करत असताना विजा चमकत असतील तर शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्या. विद्युत उपकरणे बंद ठेवा. किंवा शक्यतो जिथे आहात तिथेच रहा. शक्य असेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवा, तथापि डोके जमिनीवर ठेऊ नका. ओल्या शेतात अथवा तलावात काम करणार्या व्यक्तींनी तात्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे. पोहणारे, मच्छिमारी करणारे यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.
झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहा. एखादे उंच झाड सुरक्षित ठेवायचे असल्यास उंच वृक्षाच्या खोड अथवा फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनी खोलवर गाडून ठेवा. म्हणजे हे झाड सुरक्षित होईल. वीजवाहक वस्तूंपासून दूर रहा. उदा. रेडीयटर, स्टोव्ह, मेटल, लोखंडी पाईप, टेलिफोनचे खांब, विजेचे खांब, टेलिफोन टॉवर यापासून दूर रहा. मजबूत असलेले पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपापल्या घरी विजवाहक यंत्रणा बसवा. जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्या. वृक्ष, दलदलीची ठिकाणे तथा पाण्याचे स्त्रोत या पासून शक्यतो दूर रहा. मोकळ्या आकाशाखाली असण्यापेक्षा लहान झाडाखाली आसरा घेणे चांगले. मोकळ्या आकाशाखाली राहणे आवश्यकच असेल तर खोलगट ठिकाणी रहा. विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली उभे राहू नका. उंच जागेवर, झाडावर चढू नका. पाण्याचे नळ, फ्रिज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका. त्यापासुन दूर रहा आणि विजेवर चालणार्या यंत्रापासून तसेच धातुंपासून बनलेल्या वस्तू जसे कृषीयंत्र, इत्यादींपासुन दूर रहा. प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दूरध्वनीचा वापर करू नका. गाव, शेत, आवार, बागबगीचा आणि घर यांच्या भोवती तारेचे कूंपन घालू नका. कारण ते विजेला सहजतेने आकर्षित करते. दोन चाकी वाहन, सायकल, ट्रक, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी जा. अशावेळी वाहनातून प्रवास करू नका. वाहनाच्या बाहेर थांबणे आवश्यक असल्यास, धातूचे कोणतेही उपकरणे हातात बाळगू नका. एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नका. दोन व्यक्तिंमधील अंतर किमान 15 फूट असेल असे पाहा. धातूची दांडी असलेल्या छत्रीचा उपयोग करू नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Leave a comment