बीड । वार्ताहर
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्यानेच बसविलेल्या वॉर्ड क्रमांक 3 मध्ये खिडकी कोरोनाबाधित रुग्णाच्या अंगावर पडली. सुदैवाने त्याला जखम झाली नाही. तर बाहेर परिसरालाही सर्वत्र पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. सोमवारी (दि.31) हा प्रकार घडला.दरम्यान जिल्हा रुग्णालयात काही महिन्यांपूर्वीच डागडुजी केली होती परंतु सोमवारी झालेल्या पहिल्याच पावसात निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाला आहे.
सोमवारी बीड शहरात दुपारी मान्सूनपूर्व सरी बरसल्या. यावेळी वारेही सुटले होते. याच दरम्यान जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 3 मधील नव्यानेच बसविलेली खिडकी रुग्णाच्या खाटावर पडली. सुदैवाने रुग्ण बसलेला असल्याने त्याला जखम झाली नाही. येथे जर एखादा रुग्ण झोपलेला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. दरम्यान या वार्डातील काम तर निकृष्ट झालेच परंतु परिसरातही सर्वत्र खड्डे पडले आहेत. सिमेंट रस्त्याचे काम अर्धवट केले असून नाली ठेवलेली नाही. त्यामुळे काही ठिकाणी चिखल झाला तर काही ठिकाणी पाण्याचे डोह साचले होते. मेट्रन ऑफिससमोर जातानाही परिचारिकांना पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ आली. रुग्णालयाच्या परिसरात पहिल्याच पावसात सर्वत्र घाण साचलेली दिसली तसेच पाणीही साचले होते. त्यामुळे रुग्ण, नातेवाइकांसह डॉक्टर, कर्मचार्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून दर्जेदार काम करावे आणि हाल थांबवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते म्हणाले, खिडकी तुटल्याचे समजले आहे, पण मी नेकनूरला दौर्यावर आहे. आल्यानंतर माहिती घेणार आहे.
Leave a comment