जालना, बीडच्या संयुक्त पथकाकडून
गेवराई । वार्ताहर
गेवराई येथील वाळू घाटातून टेकेदाराने नियमापेक्षा जास्त खड्डे करून वाळूघाट खिळखिळा केल्याने, रविवारी (दि.30) दुपारी जालना आणि बीड येथील संयुक्त पथकाकडून संबंधित घाटातील खड्यांची इटीएस मशिनद्वारे मोजणी सुरू केल्याने ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी वाळू माफीयांविरूद्ध आक्रमक भुमिका घेतली आहे. महसुलच्या पथकासह वाळू घाटावर जावून पंचनामा केल्यानंतर रविवार दि.30 रोजी आ.पवारांनी पुन्हा एकदा आपली पॉवर वाळू माफीयांना दाखवुन दिली होती. बीड आणि जालना येथील पथकाकडुन रविवारी दुपारी उशीरापर्यंत खड्ड्यांची मोजणी सुरू होती. यावेळी पथकासोबत उपजिल्हा अधिकारी नामदेव टिळेकर, तहसिलदार सचिन खाडे गौण खनिज अधिकारी
आडसुळ मडळअधिकारी तलाठी सह अन्य अधिकारीही उपस्थित होते. तालुक्यातील राक्षसभुवन , पांचाळेश्वर , सुरळेगाव या गावांना बीड आणि जालना येथील पथकाने रविवार दि 30 रोजी दुपारी उशीरा भेटी दिल्या. याठिकाणी असलेल्या वाळू घाटांची पथकाने कसुन चौकशी केली. वाळू घाटाची क्षमता आणि होणारा उपसा याविषयी देखील माहिती घेतली. वाळू घाटावर क्षमतेपेक्षा जास्त खड्डे खोदुन त्यातुन वाळुचा उपसा झालेला असल्याने पथकाने इटीएस मशिनद्वारे खड्ड्यांची मोजणी दुपारी उशीरापर्यंत केली. खड्डयांची रूंदी आणि खोलीची मोजणी करून त्या आधारे केलेल्या वाळू उत्खननाची माहिती घेवुन त्यानुसार वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येणार आहे. भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी सुरूवातीपासुनच वाळू घाटाच्या प्रकरणात लक्ष घातले होते. दि .27 मे रोजी पवारांनी स्वत: वाळू घाटावर जावुन प्रत्यक्ष पाहणी केली होती . वाळू उत्खनन करून मोठमोठे खड्डे केल्याचे यावेळी आढळुन आले. सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आ.पवार यांनी केली होती. त्या पार्श्वभुमीवर बीड आणि जालना पथकाने भेटी देवुन चौकशी केली आहे. हा पाहणी अहवाल विभागीय आयुक्त केंद्रेकरांना सादर करण्यात येणार आहे.
वाळूचे खड्डे आमदारांना दाखविले म्हणून तरुणाला मारहाण
शिवसेनेच्या युध्दजित पंडितांसह चौघांवर गुन्हा
गेवराईतील वाळू उपशावरुन आता मारहाणीच्या घटना घडू लागल्या आहेत. ‘वाळूमुळे पडलेले खड्डे आमदारांना का दाखविले’ अशी कुरापत काढून एका तरुणास मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य युध्दजित पंडितांसह चौघांवर चकलांबा पोलिसांत गुन्हा नोंद झाला. रविवारी (दि.30) रोजी सकाळी साडेअकरा वाजता सुरळेगावजवळील नदीपात्रात घडली.
जनार्दन दादाभाऊ निर्मळ (31,रा.सुरळेगाव) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, सुरळेगाव येथील नदीपात्रात रविवारी सकाळी साडेअकरा वाजता ’नदीपात्रातील वाळू टेंडरचे मोठे खड्डे आमदारांना का दाखविले’, असे म्हणून युद्धजित पंडित यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. ’मी तुला अजून काहीच केले नसून काय करील ते सांगता येत नाही’, असे म्हणत शिव पंडित, किशोर पंडित व महेश पंडित यांनी काठीने आणि लोखंडी पाईपने डोक्यात, पाठीवर व पोटावर मारहाण करुन शिवीगाळ आणि खोटी केस करण्याची धमकी दिल्याचे जनार्दन निर्मळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी युद्धजित बदामराव पंडित यांच्यासह शिव पंडित, किशोर पंडित व महेश पंडित यांच्याविरुध्द चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंजुर्डे हे तपास करत आहेत.
आ.पवारांनी घेतली जखमीची भेट
सदरील मारहाणीच्या प्रकारानंतर आमदार लक्ष्मण पवार हे ताबडतोब सुरळेगाव येथे जावून मारहाण झालेल्या कार्यकर्त्याची भेट घेऊन, घाबरू नका. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सूचित केले.
Leave a comment