आजपर्यंत 105 रुग्ण दाखल; 18 जणांचा मृत्यू
बीड । वार्ताहर
कोरोना विषाणूनंतर म्युकरमायकोसिचा विळखा घट्ट होत चालला आहे. या रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठी जिल्ह्यात एकमेव अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दोन स्वतंत्र वार्ड कार्यान्वीत करण्यात आले असून या ठिकाणी आवश्यक त्या रुग्णांच्या डोळ्याची शस्त्रक्रियाही केली जात आहे. रविवार (दि.30) अखेर स्वाराती रुग्णालयात 105 रुग्ण दाखल झालेले आहेत. यापैकी 55 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या; तसेच आजपर्यंत दुर्देवाने 18 रुग्णांचा मृत्यू झाला. वेळीच रुग्ण उपचाराधिन झाल्यास म्युकरमायकोसिसचा धोका टाळता येतो, त्या दृष्टीने आवश्यक तो औषधोपचार केला जात असल्याचे स्वारातीतील नेत्रतज्ञ डॉ.भास्कर खैरे यांनी सांगीतले.दरम्यान रविवारी दिवसभरात स्वाराती रुग्णालय व महाविद्यालयात म्युकरमायकोसिचे नवे 7 रुग्ण दाखल झाले. त्यांच्यावर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत.
पोस्ट कोव्हिड रुग्णांपैकी काही रुग्णांना म्युकरमायकोसिस आजाराची लागण होत असल्याचेही आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यात गावोगावी म्युकरमायकोसिसचे रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण मोहिम हाती घेण्यात आली आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये डोळे व नाक लाल होणे, ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, रक्ताची उलटी होणे तसेच मानसिक स्वास्थ्यांमध्ये बदल जाणवणे अशी लक्षणे दिसून येतात. हाच धागा पकडून आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्तींकडून पोस्ट कोव्हिड रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली जात आहे.
सध्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आतापर्यंत 105 रुग्णांची नोंद झाली. यामध्ये काही रुग्ण बाहेर जिल्ह्यातील देखील आहेत. दरम्यान, आतापर्यंत 105 रुग्णांपैकी 55 रुग्णांवर शस्त्रक्रीया झाल्या असून 30 रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासलेली नाही. तसेच 14 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 4 रुग्ण इतरत्र रेफर करण्यात आले आहेत. रविवारी मेडिसीन बिल्डींगमध्ये उपचार घेणार्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने आजपर्यंतच्या एकूण मृत्यूचा आकडा 18 झाला आहे. तसेच 10 रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या 83 रुग्ण उपचाराखाली आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत दोन रुग्णांना एक डोळा गमवावा लागला आहे. सर्वाधिक रुग्ण 45 वयांपेक्षा अधिक वय असलेले आहेत अशी माहिती स्वारातीचे नेत्रविभागप्रमुख डॉ.भास्कर खैरे यांनी सांगीतले.
‘स्वाराती’मध्ये 54 जणांचा स्टाफ कार्यरत
म्युकरमायकोसिससच्या रुग्णांवर सध्या जिल्ह्यात केवळ अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व महाविद्यालय अशा दोन वार्डात स्वतंत्र उपचार कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी 10 नेत्रतज्ञ डॉक्टर तसेच 10 कान,नाक,घसा तज्ञ कार्यरत आहेत. या शिवाय मेडिसीन विभागात 10 तर परिचारिका, वॉर्डबॉय असा एकूण 24 कर्मचार्यांचा स्टाफ सेवेत आहे. एका रुग्णाच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी साधारण 2 ते 3 तासांचा वेळ लागतो, असे डॉक्टरांनी सांगीतले.
Leave a comment