केंद्र सरकारच्या योजनेतून मुलांचे होणार संगोपन
बीड । वार्ताहर
कोरोनामुळे आई- वडील किंवा या दोहोंपैकी एक पालक गमावलेल्या जिल्ह्यातील 18 वर्षांखालील मुला- मुलींची माहिती संकलित करण्याचे काम सध्या सुरु आहे. दुसरीकडे अशा मुलांसाठी केंद्र सरकारने नुकतीच मोठी घोषणा करत या मुलांच्या सर्व शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी स्विकारली आहे. या मुलांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या भवितव्याची सोय व्हावी, म्हणून आता थेट केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. त्याशिवाय, या मुलांच्या शिक्षणाची देखील सोय या निधीमधून लावली जाणार आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसर्या लाटेचा वेग अधिक होता. मृत्यूसत्र व रुग्णवाढ थांबता थांबत नव्हती. दरम्यान, 0 ते 18 वर्षे वयोगटातील ज्या मुला- मुलींनी आई -वडील किंवा दोन्हीपैकी एक पालक गमावलेले त्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.जिल्ह्यात एक बालक कोरोनामुळे निराधार झाला तर 60 जणांच्या वडिलांना तर 6 जणांच्या आईला कोरोनाने हिरावून नेल्याची माहिती पुढे आली आहे. 30 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही माहिती संकलित केली जात होती. दरम्यान कोरोनामुळे एक पालक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 18 वर्षांखालील बालकांची माहिती गोळा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत बाल कल्याण समिती सदस्य तत्वशील कांबळे म्हणोले, अशा मुला-मुलींना बालगृहातून शिक्षण, संगोपनाचे धोरण आखले जाण्याची शक्यता आहे. नातेवाईक सांभाळ करणार असतील तर बालसंगोपन योजनेतून 1 हजार रुपये देण्याचीही तरतूद आहे.
Leave a comment