कोरोना रुग्णसंख्या घटल्याने जिल्ह्यातील 8127 खाटा रिकाम्या!
बीड । सुशील देशमुख
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रकोप जिल्हावासियांनी अनुभवला. अगदी एक बेड मिळवण्यासाठीही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागली. काही केल्या बेड मिळत नसल्याने अनेकांना वार्डाच्या रिकाम्या पोर्चमध्येच झोपून उपचार घेण्याची परिस्थिती ओढवली. जिल्हा रुग्णालय असो की खासगी रुग्णालये कुठेही बेड मिळत नसल्याने प्रशासनाला महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून काही रुग्णालयांच्या 80 टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी आरक्षित कराव्या लागल्या. आता मात्र ही स्थिती बदलू लागली आहे. नव्या कोरोना रुग्णांची संख्या वेगाने घटू लागल्याने शिवाय दररोज कोरोनामुक्त होणार्या रुग्णांचा आकडा कमी होवू लागल्याने जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणच्या शासकीय व खासगी रुग्णालयात तब्बल 8 हजार 137 खाटा रिकाम्या झाल्या आहेत. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ही स्थिती दिसत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट प्रचंड उलथापालथ करणारी ठरली. कोरोनाची लागण झाल्याने अनेकांचा मृत्यू झाला. जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार दुसर्या लाटेत जिल्ह्यात 1300 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूची ही आकडेवारी ह्रदय हेलावून टाकणारी आहे. कोरोनाच्या महामारीने अनेकांचे घर उध्वस्थ झाले. कर्ते पुरुष गेल्याने कुटूंब उघड्यावर पडले. तसेच जिल्ह्यात 0 ते 18 वयोगटातील एक बालक कोरोनामुळे निराधार झाला तर 60 जणांच्या वडिलांना तर 6 जणांच्या आईला कोरोनाने हिरावून नेल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोनामुळे झालेल्या मनुष्यहानीची ही आकडेवारी डोळ्यात पाणी आणणारी आहे. याच दरम्यान लसीकरण मोहिमही जिल्ह्यात गतीमान झाली. फ्रंटलाईन वर्कर, जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण करण्यात आले. अजुनही लसीकरण पाहिजे त्या प्रमाणात झालेले नाही. 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण बंद आहे. एकीकडे ही स्थिती असली तरी आता कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होवू लागल्याने जिल्ह्यासाठी हा मोठा दिलासा मिळाला आहे. गत चार दिवसात रुग्णसंख्येचे आलेख उतरता राहिला आहे. शिवाय मृत्यूसत्रही थांबत आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारे बेडही रिकामे राहत आहेत.
रविवार (दि.30) अखेर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयातील रिक्त खाटांची माहिती घेतली असता दिलासादायक चित्र समोर आले. सध्या जिल्हा रुग्णालयातील 740 पैकी 104 ऑक्सीजन खाटा व ऑक्सीजन नसलेल्या 98 खाटा रिक्त आहेत. तसेच आयटीआयमध्ये 234 ऑक्सीजन खाटा असून या ठिकाणी 199 खाटा शिल्लक आहेत तर 35 रुग्ण उपचाराधिन आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी शासकीय व खासगी कोरोना रुग्णालयात एकूण 13 हजार 76 खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र मागील आठ दिवसात कोरोना बाधितांची संख्या घटल्याने आता यापैकी 8 हजार 137 खाटा रिकाम्या आहेत. तूर्तास 4 हजार 239 रुग्ण उपचाराधिन असल्याची माहिती डॉ.सचिन आंधळकर यांनी दिली.
म्युकरमायकोसिसचा कक्ष कार्यान्वीत होणार
जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसच्या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. सध्या अशा रुग्णांवर केवळ अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात उपचार केले जातात. पंरतु वाढती रुग्णसंख्या लक्षात घेवून आता जिल्हा सामान्य रुग्णालयातही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड कार्यान्वीत करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. लवकरच जिल्हा रुग्णालयाच्या नेत्रविभागाच्या इमारतीत हा कक्ष कार्यान्वीत होईल अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड व डॉ.सचिन आंधळकर यांनी ‘लोकप्रश्न’शी बोलताना दिली.
म्युकरमायकोसीसवर जिल्हा
रूग्णालयातच उपचार मिळावेत-आ.क्षीरसागर
कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असली तरी आरोग्य यंत्रणेने गाफील राहू नये. पुढील काळात कोव्हिडचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वांनी एकजुटीने स्वयंशिस्तीने काम करण्याची गरज आहे. कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांमध्ये म्युकरमायकोसीस हा आजार आढळून येत असून या रूग्णांना जिल्हा रूग्णालयात उपचार मिळावे यासाठी स्पेशल वॉर्ड कार्यान्वित करा, लहान मुलांवर कोरोना उपचार संदर्भातही विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना आ.संदिप क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.
Leave a comment