बीड । वार्ताहर
मराठा क्रांती मोर्चा मागील पाच वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि मराठा समाजाची इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी विविध पद्धतीने लढत आलेला आहे व यापुढेही लढत राहील. परंतु मागील काही दिवसांपासून असे निदर्शनास येत आहे की, समाजातील काही मंडळी आपली भूमिका ही मराठा क्रांती मोर्चाची भूमिका असल्याचे भासवत सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपले मत प्रकाशित करत आहेत. असे असले तरीही अशा व्यक्तींचा आणि मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही संबंध नाही व यापुढेही नसेल. मराठा क्रांती मोर्चाने आजवर जी भूमिका मांडली ती मराठा क्रांती मोर्चाच्या अधिकृत लेटर पॅडवरच मांडलेली आहे आहे आणि यापुढेही मराठा क्रांती मोर्चाच्या लेटरपॅडवर भविष्यातील भूमिका मांडण्यात येणार आहेत. असे बुधवारी (दि.26) मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख समन्वयकांच्या झालेल्या बैठकीत ठरवण्यात आले.
या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आले. मराठा क्रांती मोर्चा हा कुठल्याही राजकीय पक्ष, नेता, संघटना यांना बांधील नसून ही एक केवळ सामाजिक चळवळ आहे. मराठा आरक्षण संदर्भातील भूमिका क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या आणि समाजातील बांधवांच्या एकत्रित निर्णयानेच ठरवण्यात येईल.मराठा समाजाच्या आरक्षण व इतर सामाजिक प्रश्नांसंदर्भात संघटना, राजकीय पक्ष लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असतील तर त्या आंदोलनांना मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा राहील. मराठा क्रांती मोर्चाची भूमिका अधिकृत लेटर पॅड वरच घोषित व प्रकाशित केली जाईल, इतर कोणत्याही ही संदेशाद्वारे स्वतःची भूमिका मराठा क्रांती मोर्चाची भूमिका असल्याचे दिसून आल्यास त्यावर विश्वास ठेवण्यात येऊ नये.असे पत्रक मराठा क्रांती मोर्चा बीड जिल्हा समन्वयक यांनी आपल्या सहीनिशी काढले आहे.
Leave a comment