आ.पवार गोदेच्या पात्रात जावून फिरले; वाळू घाटाची केली पाहणी
गेवराई । वार्ताहर
गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात होणारी अवैध वाळू वाहतूक बंद करुन वाळू वाहतूकीसाठी वापरल्या जाणार्या हायवा ही बंद करावे त्यासाठी गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार हे स्वत:च काल गोदा पात्रामध्ये उतरले. गोदापात्रात असलेल्या वाळू घाटात जावून त्यांनी पाहणी केली. वाळूचा किती उपसा होतो. हे ही त्यांनी तपासले. वाळू माफिया जनतेच्या मुळावर उठले असून माझ्या तालुक्यातील जनतेला मी त्रास होवू देणार नाही. मी कुणाचाही मिंदा नाही. त्यामुळे अवैध वाळू उपसा आणि वाहतूक तालुक्यातून होवू देणार नाही. अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेने वाळू माफियांची पाचावर धारण झाली असून गेवराईचे महसुल प्रशासनही चिंतेत सापडले आहे. मात्र आ.लक्ष्मण पवारांच्या या भूमिकेमुळे तालुकाभरातून स्वागत होत आहे. पवारांनी वाळू माफियांचा बंदोबस्त कायम करावा. जनता त्यांच्या पाठीशी आहे. अशा प्रतिक्रिया तालुकाभरातून उमटत आहे.
अवैध धंदे करणारे वाळू माफीया समाजाच्या मुळावर बसलेत. मी, कोणाच्याही रुपयाचा मिंदा नाही. माझी बांधिलकी मतदारसंघातील जनतेशी असून, मॅनेज होणारा पैकी मी नाही. त्यामुळे, तालुक्यात सुरू असलेली वाळू चोरीची माफियागिरी बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा थेट इशारा देऊन, आ. लक्ष्मण पवारांनी अवैध वाळू वाहतूकी विरूद्ध दंड थोपटून, बुधवार ता. 26 रोजी गोदावरी पात्र गाठून वाळू घाटाची पहाणी केली आहे.
दरम्यान , वाळू साठ्याची मोजणी करा, ठेकेदारांना किती ब्रास वाळूची परवानगी दिली आहे. याची माहिती घ्या आणि आतापर्यंत किती उपसा झाला ते पहा. जास्त उपसा झाला असेल तर थेट कारवाई करून वाळू माफियांच्या मुसक्या बांधा, अशा कडक सूचना आ. पवारांनी तहसीलदारांसह मंडल अधिकार्यांना दिल्या आहेत. वाळूची वाहतूक ट्रॅक्टरनेच झाली पाहिजे. सरकारी आदेश निघाला असून, त्याची कडकपणे तात्काळ अमलबजावणी करण्याची मागणी ही आमदार लक्ष्मण पवार यांनी केली आहे. गेवराई तालुक्यातील अवैध वाळू उपसा गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. मात्र महसूल विभागासह पोलीस आणि आरटीओ विभागचे हात वाळू माफियांच्या घोंगडीखाली अडकल्याने याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले आहे. सदरचा प्रकार खपवून घेणार नसल्याचे सांगून आ. पवारांनी थेट वाळू घाट गाठला. अधिकार्यांसमवेत गोदा पात्रात जावून राक्षसभुवन , पांचाळेश्वर , सुरळेगाव या ठिकाणच्या वाळू घाटांचे स्पॉट पंचनामे केले. वाळू उपसा करणार्या ठेकेदारांनी नियमांची पायमल्ली करून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केल्याने आ. पवारांनी तहसीलदारांना या प्रकरणात कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. आपण कुणाच्या एका रुपयाचा मिंदा नसल्याचे सांगत मतदारसंघातील वाळू माफियागिरी बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही , असा आक्रमक पवित्रा ही त्यांनी घेतल्याने स्थानिक प्रशासनाची दमछाक झाल्याचे चित्र समोर आले आहे. दरम्यान, पर्यावरण आणि जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी आपण आमदार झाल्याचे सांगून , त्यांनाच बांधिल असल्याचे प्रतिपादन ही त्यांनी यावेळी बोलताना केले असून, प्रत्येक वाळु घाटाची मोजणी करा, परवानगी व्यतिरिक्त जास्त वाळुचे उत्खनन व वाहतूक केली असेल तर दोषींवर कडक कारवाई करा, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या आहेत. आ . पवार यांच्यासोबत तहसीलदार सचिन खाडे, चकलांबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख, राजेंद्र भंडारी, विठ्ठल मोटे यांच्यासह महसूल व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
एस.पी.साहेब हजारेंना कंट्रोल रुमला बोलवा
एस.पी.आर.राजा यांच्या पथकाचे प्रमुख पो.नि.हजारे यांनी देखील गोदा बेल्टमध्ये ट्रॅक्टर चालकांवर विनाकारण कारवाई करुन वसुलीचा उच्छाद मांडला आहे. हायवा वाल्यांना सॅल्यूट मारुन सोडायचे आणि गोरगरीब ट्रॅक्टरवाल्यांना धरायचे. या हजारेंच्या भूमिकेमुळे गोदाकाठच्या गावांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. हजारेंची कृती पोलीस दलाला आणि पोलीस अधिक्षक पदाला बदनाम करणारी आहे. त्यामुळे एस.पी.साहेबांनी हजारेंना कंट्रोल रुमला बोलवून त्यांच्या जागेवर दुसरा अधिकारी नियुक्त करावा अन्यथा हजारेंनाही जनतेचा प्रसाद मिळेल अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
आ.पवारांच्या भूमिकेचे तालुकाभरा कौतुक
गेवराईचे आ.लक्ष्मण पवार यांनी वाळू माफियांच्या विरोधात रणशिंग फुंकले असून ते स्वत:च आता गोदा पात्रात उतरले आहे. दोन दिवसापासून हायवा बंद झाल्यामुळे वाळू धंद्यातील पंडितांना चांगलाच रोख लागला आहे. त्यामुळे आ.पवारांच्या या भुमिकेचे केवळ गोदाकाठच्या गावातच नव्हे तर तालुकाभरातून कौतुक होत आहे.
अमरसिंह पंडित शांत का?
तालुक्याच्या विकासाचा खर्या अर्थाने अभ्यास असणारे आणि ज्यांना तालुक्याचा भौगोलीक अभ्यास आहे. एवढेच नव्हे तर अवघ्या तालुक्यातील लोक ज्यांच्याकडे अभ्यास करणारा तरुण नेता म्हणून पाहतात ते अमरसिंह पंडित या वाळू माफियांच्या विरोधात शांत आहे. त्यामुळेही लोक आश्चर्य व्यक्त करीत आहे. कोरोना संकटामध्ये ते जशे लोकांच्या मदतीला धावून आले. तसे गोदाकाठच्या गावातील गावातील लोकांच्या मदतीला त्यांनी धावून यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Leave a comment