पाच सदस्यीय समितीत सीईओअजित कुंभार यांचा समावेश
बीड । वार्ताहर
राज्याभरातील जि.प.च्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया आता ऑनलाईन प्रणालीव्दारे पार पडणार आहे. दरम्यान ही सर्व बदली प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी राज्य शासनाने पाच अधिकार्यांची समिती गठीत केली आहे. यात चार मुख्य कार्यकारी अधिकार्यांचा समावेश असून त्यांना कामकाजाची रुपरेषाही शासनाने ठरवून दिली आहे. या समितीत बीड जि.प.चे सीईओ अजित कुंभार यांचाही समावेश आहे.
मंगळवारीच राज्याच्या ग्रामविकास विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीव्दारे बदल्यांबाबत 27 फेबु्रवारी 2017 व 24 एप्रिल 2017 च्या शासन निर्णयाव्दारे सुधारित धोरण निश्चित करण्यात आले होते. या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यासाठी पुणे जि.प.चे सीईओ आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली 4 फेब्रुवारी 2020 च्या शासन निर्णयाव्दारे समिती गठीत केली गेली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसारच आता जि.प.प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन प्रणालीव्दारे करण्यासाठी 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयाव्दारे सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे.
या समितीत अध्यक्ष म्हणून पुण्याचे सीईओ आयुष प्रसाद तसेच राज्य समन्वयक म्हणून सातार्याचे सीईओ विनय गौडा, तर सदस्य म्हणून बीड जि.प.चे सीईओ अजित कुंभार, चंद्रपुर सीईओ राहुल कर्डिले, वर्धा जि.प.चे सचिन ओंबासे यांचा समावेश आहे. या समितीकडे शिक्षकांच्या जिल्हातंर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रीया संगणकीय प्रणालीव्दारे पार पाडण्यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षकांची बदली प्रक्रीया राबवण्यासाठी संपुर्ण संगणकीय प्रणाली तयार करण्याबरोबरच यासाठी लागणार्या रक्कमेचे अंदाजपत्रक तयार करणे, निधी मागणी करणे तसेच बदली प्रक्रीयेसाठी निविदा प्रक्रिया राबवणे ही कामे करावी लागणार आहेत. निविदा प्रक्रीयेत सातारा जि.प.महा आयटी, एनआयसी व सीडीएसी आदी संस्थांची मदत घ्यावी, तसेच या बदली प्रक्रीयेसाठी तयार करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीचा प्रत्यक्षात वापर करावा असेही निर्देश शासनाने दिले आहेत.
Leave a comment