बीड । वार्ताहर
गोदाकाठच्या जवळपास 8 ते 9 गावांमध्ये वाळू माफियांनी हैदोस माजवला असून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याने गावकर्यांच्या विरोधात राजरोसपणे वाळूचे अवैध उत्खनन केले जात आहे. विरोध करणार्या लोकांना घरात मारहाण करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या 8 ते 9 गावांमध्ये या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी दहशत माजली असून वाळूच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची घबाड या वाळू माफियांना सापडले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी गोदाकाठच्या गावातील लोकांसाठी हा प्रकार बंद करून गोदावरी पात्राची होणारी चाळणी थांबवावी अशी मागणी गोदाकाठच्या गावातील लोकांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. या गावातील काही सरपंच, माजी सरपंच आणि इतर पक्षाचे कार्यकर्तेही धनंजय मुंडे यांना भेटणार असून जर हे बंद झाले नाही तर गोदाकाठची जनता तुम्हाला माफ करणार नाही असा इशाराही या गावातील लोकांनी दिला आहे.
गोदाकाठी असलेल्या राक्षसभूवन, सुरळेगाव, संगमजळगाव, म्हाळसपिंपळगाव, पांचाळेश्वर, राजापूर, आदी गावांमधून वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. वास्तविक पाहता गोदाकाठी केवळ तीन गावातच अधिकृत ठेके देण्यात आलेले आहेत. कोरोना संकटाच्या काळात यंत्रणेचे दुर्लक्ष असल्यामुळे वाळूच्या धंद्यात उतरलेल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोदापात्राची अक्षरशः चाळणी करुन टाकली आहे. राक्षसभूवन, सुरळेगाव आणि राजापूर येथील गावातील लोकांनी अनाधिकृत वाळू उपश्याला विरोध केल्यामुळे काही नागरिकांना घरात जावून मारहाण करण्याचे प्रकारही घडले आहेत. या धंद्यातून गेवराई तहसील आणि पोलीस प्रशासनाला मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत असल्याने या प्रशासनातील अधिकारी वाळू माफियांच्या मागे-पुढे फिरत असल्याचे चित्र कायम दिसत आहे. मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असल्याने उद्या पावसाळ्यात गोदावरी नदीला पूर आला आणि नदीचे पात्र जर बदलले तर हजारो हेक्टर जमीन वाहून जाण्याची भिती या परिसरातील शेतकर्यांना आहे. जमिनीबरोबरच पिकेही भूईसपाट होतील आणि त्यातून शेतकर्यांचे मोठे नुकसान होईल यामुळे नियमानेच वाळू उपसा करावा अशी मागणी काही ग्रामस्थ करीत आहेत मात्र त्यांचा आवाज दाबण्याचे काम वाळू माफियांनी सुरु केले आहे.
धनुभाऊ निदान स्व.गोपीनाथ मुंडेंसाठी एवढे करा
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी युतीचे सरकार असतांना पैठणपासून तर नांदेडपर्यंत गोदाकाठच्या गावामध्ये रस्ते दिले होते. काही भागात अजूनही ते रस्ते आहेत. या भागातील शेतकर्यांसाठी आणि विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी स्व.मुंडेंनी गोदावरील परिक्रम केली होती. गोदाकाठ हा स्व.मुंडेंना डोक्यावर घेवून नाचणारा भाग होता त्यामुळे पालकमंत्री म्हणून धनुभाऊ तुम्ही या भागाकडे लक्ष द्या. वाळू माफियांनी चालवलेला हैदोस बंद करा यामध्ये तुमच्या पक्षाचेही कार्यकर्तेही आणि तुमच्या मित्रपक्षाचेही कार्यकर्तेही आहेत या सर्वांना आवरा नाहीतर गोदाकाठ तुम्हाला कधीही माफ करणार नाही.
आ.पवारांनी घेतली लोकप्रश्नची घेतली दखल
आज गेवराई तहसीलमध्ये बैठक
दै.लोकप्रश्नने गोदापात्रातील अवैध वाळू उपसाबद्दल काल वृत्त प्रकाशित केल्यानंतर आ.लक्ष्मण पवार यांनी या संदर्भात दखल घेत हा प्रकार बंद करण्यासाठी आज गेवराई तहसीलमध्ये महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि वाळूचे ठेकेदार यांची बैठक बोलावली आहे. हा प्रकार बंद केला न ाही तर आपण उपोषणाला बसू असा इशाराही आ.लक्ष्मण पवार यांनी दिला आहे.
नायब तहसीलदार जाधवर सेवक जनतेचे की वाळूमाफियांचे
गेवराईच्या शासकीय विश्रामगृहात बसून मोठ्या रुबाबात तहसिलचा कारभार हाकणारे आणि वाळू माफियांच्या तालावर नाचणारे नायब तहसीलदार प्रशांत जाधवर हे केवळ वाळू माफियांसाठीच गेवराईमध्ये नियुक्त झाले की काय? अशी शंका ग्रामस्थांना येवू लागली आहे. कारण सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी ते तहसीलमध्ये कधीच नसतात. तहसीलदार खाडे येण्यापूर्वी त्यांच्याकडे तहसीलदार पदाची जबाबदारी होती त्यावेळी देखील त्यांनी केवळ वाळू माफियांसाठीच कार्यालय चालवले असा आरोपही केला जात आहे. या परिस्थितीत गेवराई शहर आणि तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना त्या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याऐवजी दिवसभर विश्रामगृहावर बसून आराम करायचा आणि रात्री माफियांनी सांगितलेल्या गाड्यावर कारवाई करायची हा नित्यक्रम चालू आहे त्यामुळे प्रशांत जाधवर यांच्यावरही कारवाईची मागणी होत आहे.
तु मारल्यासारखं मी रडल्यासारखं करतो
तहसीलदार खाडेंकडून वाळू जप्तीचे सोंग
तालुक्यात मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक होत असल्याची माहिती महसुल प्रशासनाला मिळताच तहसिलदार सचिन खाडे यांनी महसुल पथकासोबत सोमवारी (दि.24) अचानक धडक कारवाई केली. यात जवळपास सावरगाव व म्हाळजपिंपळगाव येथे 150 ब्रास वाळू साठा व इतर काही साहित्य जप्त करण्यात आला.या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
महसुल प्रशासन कोरोनाच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन वाळू माफियांनी तालुक्यातील गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू केली होती. याला चाप बसवण्यासाठी तहसिलदार खाडे यांनी वाळुमाफियावर कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला असून, रविवार दि.23 रोजी तहसीलदार खाडे यांनी महसूल पथक सोबत घेत संगमजळगाव येथे छापा टाकला 200 ब्रास वाळूचा अवैध साठा आढळून आल्याने तो जप्त केला. तर राक्षसभुवन येथे ही अंदाजे 70 ब्रास वाळू साठा जप्त करून सदर वाळू विश्राम गृह गेवराई येथे आणण्यात आली असून या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असूून सदरील जप्त वाळू साठा विश्राम गृह गेवराई येथे आणण्यात आला सदर कारवाई नायबतहसिलदार प्रशांत जाधवर, मंडळअधिकारी अंगद काशिद ,सानप मंडळ तलाठी अक्षय डोके, पखाले,लेडाळ,अनिल गायकवाड़ राहुल मिसाळ,गोविंद ढाकणे ,सोनार यांनी केली. एवढ्यावर न थांबता सावरगाव व म्हाळजपिंपळगाव या ठिकाणी अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती खाडे यांना मिळताच त्यांनी महसुल पथकाला सोबत घेऊन सोमवार दि.24 रोजी सावरगाव व म्हाळजपिंपळगाव या ठिकाणी अचानक धाड मारून 150 ब्रास वाळू साठा व इतर काही साहित्य जप्त केले आहेत. तहसीलदार सचिन खाडे यांनी सलग दुसर्या दिवशी कारवाईचा सपाटा लावल्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
हायवा झाल्या बंद
गोदापात्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूचे उत्खनन करुन , एकाच इनव्हॉइसवर अनेक हायवा भरुन वाळूची चोरी करणार्या वाळूमाफियांचे हायवा काल बंद करण्यात आले आ.लक्ष्मण पवार यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडला होता त्यासाठी उपोषण केले होते. त्याची दखल शासनाने आणि प्रशासनाने घेत त्यासंदर्भात काल आदेश काढण्यात आला. हायवा बंद करण्यात आल्या मात्र सायंकाळी पुन्हा काही हायवाच्या माध्यमातून वाळू वाहतूक करण्यात आली.
अजूनही सुधरा नाहीतर शनिदेव कोपतील
गेवराईचा गोदाकाठ साधा नाही या गोदाकाठचे ज्याने वाटोळे केले त्याचेही वाटोळे झाले कारण या गोदाकाठी श्री शनिदेवाची छाया आहे. शनिदेवाने राजकारणात अनेकांना झटके दिले आहेत. या भागात मनमानी करणार्या अधिकार्यांना देखील शनिदेव सोडत नाहीत त्यामुळे तहसीलदार खाडे आणि नायब तहसीलदार जाधवर यांनी आपल्या सद्सद् विवेक बुद्धीला स्मरून प्रामाणिक काम करावे आणि वाळू माफियांवर कारवाई करावी अन्यथा शनिदेव कोपल्यावर कोणताही मंत्री किंवा आमदार तुम्हाला वाचवणार नाही अशी चर्चा गोदाकाठच्या गावात होवू लागली आहे.
Leave a comment