अत्यावश्यक सेवा वगळून किराणा दुकानांसह इतर दुकाने बंदच राहणार
बीड । वार्ताहर
जिल्ह्यातील कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने 1 जूनपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्ह्यात 15 ते 25 मे या दहा दिवसांसाठी कडक निर्बंध जारी केले होते. मात्र आता ही मुदत संपल्यानंतरही आणखी 7 दिवस म्हणजेच 31 मे पर्यंत पूर्वीचेच कडक निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. म्हणजेच पूर्वीच्या दहा दिवसांप्रमाणेच अत्यावश्यक सेवा वगळून किराणा व इतर सर्व दुकाने बंदच राहणार आहेत. यासंदर्भात आज सोमवारी (दि.24) जिल्हाधिकारी जगताप यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या सुधारित आदेशानुसार जिल्ह्यात 25 ते 31 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व औषधालये, दवाखाने, निदान क्लिनिक, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल्स कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतूक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय उपकरणे,कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलयिमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा इत्यादी अत्यावश्यक सेवेत मोडणार्या आस्थापना सुरु राहतील. या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना या कालावधीत चालू राहणार नाहीत.
दरम्यान दररोज सरकाळी 7 ते 10 या वेळेत दुधविक्री करता येईल. तसेच सकाळी 7 ते 9 यावेळेत भाजीपाला विक्रीस केवळ हातगाडीवरुन परवानगी देण्यात आली आहे. गॅस वितरण दिवसभर सुरु राहील. बँक,ग्रहक सेवा केंद्रांचे कामकाज प्रत्येकदिवशी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरु राहिल. परंतु केवळ शासकीय व्यवहार, पेट्रोलपंप व गॅस एजन्सी धारकांचे व्यवहार, कृषी निविष्ठांशी संबंधित व्यवहार, वैद्यकीय कारणासाठी केले जाणारे व्यवहार, सर्व शासकीय योजनेचे लाभार्थी यांच्या वेतनाचे व्यवहार, अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणार्या आस्थापनांना या वेळेत बँकेत जावून व्यवहार करण्यास मुभा असेल. दरम्यानच्या काळात एटीएम कॅशच्या वाहनांना परवानगी असेल. तसेच दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत बँकेच्या कर्मचार्यांना केवळ अंतर्गत कामकाज करता येईल. शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे सुरु राहतील. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्रीची दुकाने पूर्णवेळ पूर्णपणे बंद ठेवण्याचा चांगला निर्णयही प्रशासनाने घेतला आहे. तसेच लसीकरणासाठी 45 वर्षावरील ज्या व्यक्तींना मोबाइल मेसेज अथवा आरोग्य विभागाचे पत्र आले आहे, त्यांना लसीकरणाचा डोस घेण्यासाठी जाता येईल. यासाठीचे पत्र,आधारकार्ड सोबत बाळगावे असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान 25 मे रोजी रात्री 12 ते 31 मे रोजी रात्रीचे 12 वाजेपर्यंत निर्बंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे दिसून आल्यास त्या सील केल्या जाणार असून त्यांचा परवानाही रद्द करण्याची कारवाई केली जाईल असा इशाराही जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिला आहे.
रेशन दुकाने 26 पासून सहा तास सुरु राहणार
सुधारित आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने 26 मे पासून सकाळी 7 ते 1 या वेळेत धान्य वितरणासाठी सुरु ठेवता येणार आहेत. रेशनसाठी जाणार्या व्यक्तींनी रेशनकार्ड, आधारकार्ड सोबत बाळगावे. तसेच कृषी विक्रेत्यांना शेतकर्यांना बी-बियाणे,खते,औषधे विक्री व खरेदीसाठी सकाळी 7 दुपारी 1 यावेळेत परवानगी देण्यात आली आहे.
Leave a comment