आधी मृतदेह न्यायला सांगीतला
नंतर नातेवाईकांवरच नोंदवला गुन्हा!
बीड । वार्ताहर
कोरोना संकटात सातत्याने वादात सापडलेल्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा आणखी एक कारनामा सोमवारी (दि.17) समोर आला. कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूपश्चात केलेल्या अँटीजन चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने विनंतीवरुन मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला खरा मात्र अचानक रुग्णालय प्रशासनाला शहाणपण सुचले अन् वैद्यकीय अधिकार्यांनी नातेवाईकांना कारवाई करु अशी भीती दाखवत मृतदेह परत आणण्यास सांगितले. एवढ्यावरच जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे समाधान झाले नाही. नातेवाईकांनी मृतदेह बीडमध्ये आणल्यावर नगरपालिका कर्मचार्यांकडून अंत्यविधी सुरु असतानाच शहर पोलीस ठाण्यात नातेवाईकांवर मृतदेह पळविल्याचा आरोप लावून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या प्रकारामुळे जिल्हाभरात रुग्णालय प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला जात असून मृतदेहाची हेळंसाड केल्याप्रकरडणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक आणि कर्मचार्यांविरुध्द शहर ठाण्यात सायंकाळी तक्रार दाखल केली. आता पोलीस या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखवणार की, प्रकरण चौकशीवर ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील एक 32 वर्षीय महिला 23 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात उपचारासाठी दाखल झाली. वॉर्ड्र क्र.5 मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.सुरुवातीला त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला होता. नंतर प्रकृती खालावत गेली. त्यातच सोमवारी पहाटे पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मयत महिलेच्या नातेवाईकांनी अंत्यविधीसाठी शव ताब्यात देण्याची मागणी केली तेव्हा कक्षप्रमुखांनी सुरुवातीला विरोध केला. नंतर नतेवाईकांच्या विनवणीनंतर त्यांनी अँटीजन चाचणी करण्याचा निर्णय घेतला. मृत्यूपश्चात अँटीजन चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने मृतदेह नातेवाईकांकडे दिला गेला. कुंभारवाडी येथे कोविड नियमांचे पालन करुन नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी केली पण गावाजवळ गाडी पोहोचताच जिल्हा रुग्णालयातून नातेवाईकांना फोनवर ‘मृतदेहावर तुम्हाला अंत्यविधी करता येणार नाहीत’, असा निरोप दिला गेला. दु:खात असलेल्या नातेवाईकांनी पुन्हा गयावया केली मात्र रुग्णालयाकडून कारवाईचा इशारा दिला गेला. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह बीडला आणला. संत भगवान बाबा प्रतिष्ठानजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु याचवेळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांवर मृतदेह पळविल्याचा आरोप करत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु केली. वॉर्ड क्र.5 मधील अधिपरिचारिका अर्चना पिंगळे यांच्या फिर्यादीवरुन मयत महिलेच्या पतीसह इतर अनोळखी तीन नातेवाईकांवर कोविड अधिनियमाचे उल्लंघन केल्याच्या कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला.दरम्यान याबाबत मृत महिलेचा भाऊ सुभाष कबाडे यांनी सांगीतले की, मृतदेह जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या संमतीने नेला होता. गावाजवळ पोहोचल्यावर निरोप आल्याने त्यांच्या विनंतीनुसार पुन्हा बीडला मृतदेह घेऊन आलो;परंतु अंत्यविधी सुरु असतानाच आमच्यावर मृतदेह पळविल्याचा आरोप करुन गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती कळाल्याने धक्का बसला.
डॉ. गित्ते,डॉ.राठोड यांच्यासह वार्डप्रमुखाविरुध्द तक्रार
या प्रकरणात मयत महिलेचा भाऊ सुभाष कबाडे यांनी शहर ठाण्यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे. बाधित रुग्णाची दहा दिवसानंतर कोरोना चाचणी करण्याची गरज नाही, असे आयसीएमआर सांगते. या प्रकरणात 24 दिवस उलटले होते. शिवाय अँटीजन निगेटिव्ह होती, शिवाय प्रशासनानेच आधी मृतदेह ताब्यात दिला होता. त्यानंतर मृतदेहाची अवहेलना करुन नातेवाईकांवरच गुन्हा नोंद करण्यात आला. त्यामुळे मृतदेहाची हेळसांड केल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोडव वॉर्डप्रमुख यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी सुभाष कबाडेयांनी केली आहे.
रुग्णालय प्रशासनाची दुटप्पी भूमिका
याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड म्हणाले, उपचार सुरु असलेल्या महिलेचा 24 दिवसानंतर मृत्यू झाला. मृत्यूपश्चात अँटीजन चाचणी केली ती निगेटिव्ह आली. दरम्यान कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर अंत्यविधीबाबत दिशानिर्देश ठरलेले आहेत. त्यानुसार नातेवाईकांना अंत्यविधीसाठी परवानगी देणे शक्य नव्हते. मात्र, नातेवाईक विनवणी करत होते. त्यावेळी नेमके काय घडले माहीत नाही पण मृतदेह घेऊन नातेवाईक गेले. त्यामुळे त्यांना परत बोलावून नियमानुसार बीड पालिकेमार्फत अंत्यविधी करण्यात आले.
Leave a comment