अंबाजोगाई । वार्ताहर
येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या कोवीड हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी येणार्या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांची टीम अतिशय परीश्रम घेत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. एक आश्चर्यचकित करणारे उदाहरण समोर आले आहे.
मेघराज चौधरी कोरोना रुग्णावर उपचार चालू असताना त्यांचा ऑक्सिजन लेवल 40 वर गेला होता, मात्र या परिस्थितीत प्रयत्नांची पराकाष्ठा करुन स्वारातीच्या वैद्यकीय टीमने त्यांचा ऑक्सिजन लेवल 96 वर आणून त्यांना नवे जीवनदान मिळवून आज त्यांना सुखरुप घरी सोडले आहे.अंबाजोगाई शहरातील मोची गल्ली विभागात राहणारे व येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत लिपीक या पदावर कार्यरत असलेले मेघराज प्रयागराम चौधरी हे 10 एप्रिल रोजी कोरोनावरील उपचारासाठी कोवीड युनीट 3 मध्ये दाखल झाले होते. या ठिकाणी मेघराज यांच्यावर उपचार चालू असताना त्याची ऑक्सिजन पातळी खाली जात जात एकदम 40 वर जावून पोहोचली. मेघराज यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याचे लक्षात येताच त्यांना व्हेंटिलेटर उपलब्ध असलेल्या वॉर्ड क्र.17 मध्ये शीफ्ट केले. या ठिकाणी मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली मेघराज यांच्यावर डॉ. सचीन चौधरी, डॉ. अनील मस्के, डॉ. विश्वजित पवार, डॉ. विशाल लंगे, डॉ. इरा ढमढेरे, डॉ. अक्षय अंबेकर, डॉ. अस्मिता, डॉ. शुभम, डॉ. नवीन सायनी, डॉ. मस्तकीन शेख, डॉ. अभिषेक शर्मा यांनी उपचार सुरू आले.
या उपचार कालावधीत मेघराज हे सलग दहा ते बारा दिवस व्हेंटीलेटरवर उपचार घेत होते. सदरील उपचार कालावधीत अनेक वेळा मेघराज अत्यावस्थ होवून परत नॉर्मल झाले आणि हळुहळू त्यांची प्रकृती सुधारत गेली. बारा दिवस व्हेंटीलेटरवर असणारे मेघराज स्थीर झाल्यानंतर त्यांना ऑक्सिजन पातळी नॉर्मल होण्यासाठी परत आठ दिवस ऑक्सिजनवर ठेवून उपचार करण्यात आले. ऑक्सिजन पातळी 40 वर गेलेली असतांना त्यांना मृत्यू च्या दाडेतून बाहेर काढण्याचा चमत्कार स्वारातीच्या कोवीड हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या उपचारांमुळे घडला आहे. मेघराज यांचा ऑक्सिजन लेवल आता 96 च्या पुढे सरकल्या नंतर आज रीतसर त्यांना डिस्चार्ज देवून सुखरुप घरी सोडण्यात आले आहे. मेघराज यांना पुर्नजन्म दिल्याबद्दल चौधरी परीवाराने स्वारातीच्या सर्व डॉक्टर टीमचे आभार मानले आहेत.
Leave a comment