बीड । वार्ताहर
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत शनिवारी (दि.15) जिल्हा आरोग्य विभागाने महत्वाचा बदल केला. 45 वर्षांवरील नागरिकांना आता लसीसाठी जिल्हा परिषदेने तयार केलेल्या अॅपवर नोंदणी बंधनकारक केली गेली आहे. या अॅपमधून नोंदणीनंतर टोकन मिळेल, त्या टोकनचा क्रमांक आल्यानंतर लाभार्थ्यांना मेसेज किंवा कॉल येईल. त्यानंतर त्यांनी लस घेण्यासाठी केंद्रात जायचे आहे. केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.
जिल्ह्यात कोविड प्रतिबंध लसीकरण मोहिम सुरु आहे. 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बंद आहे तर, 45 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना केवळ दुसरा डोस दिला जात आहे पहिला डोस देणेही बंद आहे. लस पुरवठा कमीअसल्याने हा निर्णय शासनाने घेतला आहे. दरम्यान, लसीकरणासाठी कोविन अॅप वरुन ऑनलाइन स्लॉट बुक करावा लागे याची मर्यादा केवळ 200 आहे त्यामुळे अनेकांना बुकिंग मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत असे. त्यामुळे बीड जिल्हा परिषदेने ऑफलाइन पद्धतीने ज्येष्ठांना स्पॉट बुकिंगची सुविधा दिली होती. रजिस्टरवर नोंद केल्यानंतर आरोग्य केंद्रातून संपर्क करुन बोलावले जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र, रजिस्टरवर नोंद करण्यासाठीही शेकडो नागरिकांच्या रांगा केंद्रावर लागलया होत्या. लस घेण्यासाठी आलेले नागरिक आणि नोंदणीसाठी आलेेले नागरिक अशी दुप्पट गर्दी होत असे. तर, दुसरीकडे कोविनवर दोनशेहून अधिक नोंद होत नसल्याची अडचण होती. यावर पर्याय शोधण्यात आला आहे. बीड जि. प.ने गतवर्षी तयार केलेल्या इझी अॅपवर आता ज्येष्ठांची नोंद होणार आहे. ही नोंदणी झाल्यानंतर ज्येष्ठांना एक टोकन क्रमांक मिळेल. त्या टोकन क्रमांकानुसार लस साठा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य केंद्रातून अनुक्रमांकानुसार लसीकरणासाठी नोंदणीकृत मोबाईलवर मेसेज पाठवले जातील किंवा कॉल केला जाईल. ज्यांना मेसेज किंवा कॉल आला आहे त्यांनीच लस घेण्यासाठी यायचे त्यामुळे इतरांची गर्दी कमी होईल. तसेच मिळालेला टोकन क्रमांकचा स्टेटसही कळणार आहे. गतवर्षी तयार केलल्या निडली अॅपवरुन आपल्या टोकन क्रमांकाची स्थिती काय आहे हे कळेल.हा प्रयोग लसीकरणातील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली.
Leave a comment