मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली तक्रार
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात प्रशासनाने रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू केला असून ज्या उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांच्याकडे रेमडीसीविर इंजेक्शन च्या नियंत्रण आणि वाटपाची जबाबदारी दिली आहे, त्यांच्याच नियोजन शून्य कारभारामुळे रूग्नांचे जीव धोक्यात आले आहेत, यासंदर्भात मंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेऊन अशा अधिकार्यावर कार्यवाही करावी अशी मागणी युवासेनेचे अभिजित बरीदे यांनी मंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. सदरील प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून रुग्णांना योग्य वेळी रेमडीसीविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना द्याव्यात अशीही मागणी बरीदे यांनी ना. शिंदे यांच्याकडे केली.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, जिल्ह्यात रेमडीसीविर इंजेक्शन वा ऑक्सिजन चा तुटवडा निर्माण झाला असताना जिल्हा प्रशासनाने कोणत्याही सुविधा पुरवल्या नाहीत. रेमडीसीविर सारख्या इंजेक्शन ची रुग्णांना गरज असताना अन्न आणि औषध प्रशासन यंत्रणा कुचकामी ठरली आहे. अशावेळी जिल्हाधिकारी यांनी उपजिल्हाधिकारी धरमकर यांच्याकडे ही जबाबदारी दिली, मात्र धरमकर हे देखील मनमानी कारभार करत आहेत असा आरोप बरीदे यांनी पत्रकात केला आहे. अनेक रुग्णांना इंजेक्शन चा एकच डोस दिला जात आहे, जेव्हा गरज आहे तेव्हा इंजेक्शन दिले जात नाही. एक रुग्णाला सहा किंवा सात इंजेक्शन आवश्यक असताना धरमकर यांनी एक इंजेक्शन देण्याचा फतवाच काढला आहे, त्यामुळे या एक इंजेक्शन चा काहीच उपयोग होत नाही. जिल्ह्यातील अशा मुजोर अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी युवासेनेचे अभिजित बरीदे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी मंत्री ना. शिंदे यांच्या कडे केली आहे
Leave a comment