244 ऑक्सिजन बेड होत आहेत तयार, 50 बेड होणार कार्यान्वित
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मागील आठवड्यात घेतलेल्या आढावा बैठकीत दिलेल्या सूचनांप्रमाणे नगर रोड वरील आयटीआय येथे 244 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे, तेथे मुंडे यांनी जिल्हाधिकार्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली.
नगर रोडवरील शासकीय आयटीआय येथे एकूण 244 ऑक्सिजन बेड उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, येथे 50 ऑक्सिजन बेड आज (दि. 8) पासून कार्यान्वित करण्यात येणार आहेत. येथे उपलब्ध असलेल्या सुविधा, ऑक्सिजन पॉईंट, उपलब्ध डॉक्टर्स व अन्य स्टाफ आदी सर्व बाबींची ना. मुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी माजी आ. प्रा. सुनील धांडे, मा. आ. सय्यद सलीम, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर. राजा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार आदी उपस्थित होते. आयटीआय येथे उपलब्ध ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स, तसेच उपलब्ध स्टाफ प्रमाणात असून, रुग्णसंख्येच्या वाढीच्या प्रमाणात आवश्यकतेप्रमाणे वाढवून घ्यावेत अशा सूचना यावेळी ना. मुंडेंनी संबंधितांना केल्या. स्टाफ नर्स, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करण्यासाठी आवश्यक असेल तिथे माझी मदत घ्या, तसेच उर्वरित बेड तत्परतेने कार्यान्वित करून घ्या असेही धनंजय मुंडे यांनी सुचवले आहे.
Leave a comment