प्रशासनाला घाम फुटेना-आ.सुरेश धस यांचा आरोप
गप्पा मारण्यापेक्षा सत्ताधार्यांनी आरोग्य विभागाची दुरावस्था पहावी
आष्टी । वार्ताहर
कोरोनाच्या दुसर्या लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना आरोग्य अन् जिल्हा प्रशासनाकडून रुग्णांना आरोग्य सेवा देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बीड जिल्ह्यात कोणत्याही ठोस सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, अन् प्रशासन व सत्ताधारी नेते जिल्ह्यात ऑक्सीजन प्लांट उभारण्याचे आश्वासन देत आहेत. वास्तविक अशा गप्पा मारण्यापेक्षा सत्ताधार्यांनी सध्याची स्थिती किती विदारक आहे हे जमिनीवर येवून पहावे. गोरगरिब लोक रस्त्यावर जीव सोडत आहेत. मृत्यूचे तांडव सुरु आहे, याचे कसलेही गांभीर्य प्रशासनाला राहिलेले नाही अशा शब्दात आ.सुरेश धस यांनी वेळकाढूपणा करणार्या प्रशासनावर टिका केली.
आष्टी येथे आयोजीत पत्रकार परिषदेत आ.धस बोलत होते. यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत वाढचं होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे गृहविलगीकरणातील लोक हे घरात न बसता बाहेर फिरत आहेत. यामुळे कोरोना बाधित संख्येमध्ये वाढ होत आहे. दुसरीकडे जि.प.आरोग्य विभागाचा कारभार हा ‘आधळं दळतयं अन् कुत्र पीठ खातय’ असा झाला आहे. अॅन्टीजेन किट नाही, कोरोनाच्या भितीने लोक ऑक्सीजन घेण्यासाठी हजारोच्या संख्येने ग्रामीण रुग्णालयात येत आहेत. मात्र कसलेही नियोजन नसल्याने हताश होऊन लोक घरी परतत आहेत. जि.प.सीईओंचा प्रशासनावर कसलास अंकुश राहिला नाही. कोरोना बाधित रुग्णांमध्ये ऑक्सीजन पातळी कमी असणे, न्युमोनिया स्कोअर 20, 22 पर्यंत असणारे रुग्ण निष्पन्न होत आहे. जिल्ह्यातील अशा गंभीर रुग्णांकडे अधिकचे लक्ष देणे गरचेजे आहे. दुसरीकडे रेमडीसिव्हरचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरु आहे .यामध्ये प्रशासकीय अधिकार्यांचेच काळे-बेरे आहे की काय? अशी शंका व्यक्त होत आहे.गरिबांना जगण्याचा अधिकार नाही काय? असा सवालही आ.सुरेश धस यांनी केला.
सध्या राज्यातील प्रमुख आठ कोरोना बाधितांच्या जिल्ह्यात नगर जिल्ह्याचा समावेश असून यात आष्टी तालुक्याचा बराच भाग येतोय ही आष्टीकरांसाठी धोक्याची घंटा आहे.ऑक्सीजन प्लांट उभारणाच्या गोंडस गप्पा मारणारांनी बीड येथील राऊत व जोगदंड यांच्या प्लांटलाच कच्चा माल पुरवावा.आज आरोग्य विभागात नौकरी करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस,एमपीडब्ल्युचे कर्मचारी देखील तुटपुंज्या पगारामुळे काम करण्यात तयार नाहीत. एमबीबीएस अॅलोपॅथी व होमिओपॅथी डॉक्टरांच्या पगारात देखील मोठी तफावत असल्याने डाँक्टर नोकर्या सोडत आहेत, याची दखल आरोग्य मंत्री राजेश टोपेनी घ्यावी.आज कित्येक पत्रकार कोरोना बाधित आहेत. परिस्थिीअभावी ते शासकीय कोवींड सेंन्टरमध्ये उपचार घेत आहेत. पत्रकारांना शासनाने काही तरी मदतीचा हात अशा कठीण परिस्थितीत द्यायला हवा अशी मागणीही आ.धस यांनी केली.
खोर्याने पैसे ओढण्याचे दिवाळस्वप्न पाहू नका!
कोरोनाने भीषण परिस्थिती निर्माण झालेली असतानादेखील काही कोव्हिड केअर सेंटरवाले खोर्याने पैसे ओढण्याचे दिवाळस्वप्न पाहत आहेत. अहो, तुमच्यात काही माणूसकी शिल्लक असेल तर गोरगरिबांचा जीव जाणा अशा शब्दात रुग्णांची लुट करणार्या डॉक्टरांवर आ.धस यांनी निशाणा साधला.काही डॉक्टरांची अशा संकटकाळात पैसे कमवण्याची लालसा प्रचंड बळावली आहे हे खूप क्लेशदायक आहे असेही ते म्हणाले.
Leave a comment