बाटलीत असते पाणी किंवा पॅरेसिटीमल
बीड । वार्ताहर
बीड शहरासह आता ग्रामीण भागातही कोरोना मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. खासगी रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडून उपचार करणार्या डॉक्टरांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यासाठी आग्रह धरला जात आहे. खासगी रुग्णालयामधून रेमडेसिवीर उपलब्ध करुन देण्याचे नातेवाईकांना सांगीतल्यानंतर रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर उपलब्ध करण्यासाठी धडपड करत आहेत. बीड शहरातील काही खासगी रुग्णालयातील कर्मचारीच रेमडेसिवीरचा काळाबाजार करत असून रुग्णांनी हे रेमडेसिवीर इंजेक्शन विकत घेवू नयेत. कारण रिकाम्या झालेल्या बाटल्यामध्ये दुसरेच औषध किंवा पाणी अथवा पॅरिसिटीमल भरुन विक्री केली जात आहे. पैशासाठी खासगी रुग्णालयातील कर्मचारी काहीही करु लागले असून यांची टोळीच तयार झाली आहे, त्यामुळे काळ्या बाजारातील रेमडेसिवीर कोणीही विकत घेवू नका. प्रशासनाकडून मिळणारेच इंजेक्शन घेणे रुग्णाच्या हिताचे ठरणार आहे.
रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ऑक्सीजन,रेमडेसिवीर आणि बेड या तीनही गोष्टींचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील कुठल्याही रुग्णालयात बेड शिल्लक नाही. ऑक्सीजनची उपलब्धता आता होवू लागली आहे, त्यामुळे ऑक्सीजनची अडचण नाही परंतु रेमडेसिवीर इंजेक्शन अजुनही रुग्णसंख्येप्रमाणे मिळत नाही. खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना रिस्क नको म्हणून डॉक्टर रेमडेसिवीर आणायला सांगत आहेत. आता प्रशासनाने ही जबाबदारी रुग्णालयांवरच दिली आहे. तरीही काही रुग्णांचे नातेवाईक प्रशासनाकडून केव्हा मिळणार? असे म्हणत काळ्याबाजारात रेमडेसिवीर खरेदी करण्याचा खटाटोप करत आहेत. शहरातील काही खासगी रुग्णालयात पॅथालॉजी लॅबमध्ये काम करणारी मुले, नर्सेस आणि सफाई कामगार यांचे रॅकेट तयार झाले असून रुग्णांनाच तुम्हाला इंजेक्शनची गरज आहे, आम्ही आणून देतो, 25 हजारांना मिळेल, असे सांगीतले जात आहे. रुग्णांकडून हा निरोप त्यांच्या नातेवाईकांकडे दिला की, काळ्याबाजारात मिळणारे रेमडेसिवीर घेण्यासाठी नातेवाईक आटापिटा करत आहेत. मात्र बीडसह राज्यात बोगस रेमडेसिवीर इंजेक्शन पकडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी विनाकारण पैसे खर्च करुन आपल्या रुग्णाचा जीव धोक्यात घालू नये. एक दिवस उशिर का होईना परंतु प्रशासनाकडून मिळणारेच रेमडेसिवीर घ्यावे आणि आपली फसवणूक टाळावी. काही मेडिकलवाल्यांनी देखील बनावट रेमडेसिवीर बाजारात विक्रीसाठी आणल्याची चर्चा बीडमध्ये आहे. अन्न व औषध प्रशासनाने या बाबीकडेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार्या कर्मचार्यांना पोलीस प्रशासनाने देखील पकडून हिसका दाखवणे आवश्यक झाले आहे.
Leave a comment