बीड । वार्ताहर
मुंबई इंडियन्स विरुध्द चेन्नई सुपर किंग्स यांच्यात शनिवारी (दि.1) रात्री खेळविल्या गेलेल्या सामन्यावर सट्टा लावून जुगार खेळणार्या चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले. पेठ बीड पोलिसांनी रात्री साडेआठ वाजता अशोकनगर भागात ही कारवाई केली. आरोपींकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित 30 संशयित पळून गेले.
पेठ बीड भागातील अशोकनगर शाळेजवळ शनिवारी एका पत्र्याच्या शेडमध्ये मुंबई इंडियन्स विरुध्द चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळविल्या गेलेल्या सामन्यावर सट्टा लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी पोलीस अंमलदार सुनील अलगट, गणेश जगताप, अमोल दरेकर, महेंद्र ओव्हाळ, कलीम इनामदार, असद शेख, अन्सार मोमीन यांना सोबत घेऊन छापा टाकला.यावेळी शेख सर्फराज शेख इब्राहिम, शेख मतीन शेख ईस्माइल (दोघे रा.बीड मामला, पेठ बीड), शेख सद्दाम शेख खुदबोद्दीन (रा.अजीजपुरा) व शेख शहबाज शेख इलियास (रा.शंहेशावली दर्गाजवळ पेठ बीड) या चौघांना ताब्यात घेतले. इतर 30 जण पळून जाण्यात यशस्वी झाले.आरोपींकडून रोख रक्कम, जुगार साहित्य, चार मोबाइल, चार दुचाकी असा एकूण दोन लाख 99 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पो.ना.गणेश जगताप यांच्या फिर्यादीवरुन जुगार, कोविड अधिनियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.
Leave a comment