स्वाराती व लोखंडीच्या रुग्णालया घेतला आढावा
परळीत उभारले 50 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर
शुक्रवार पासून परळीच्या ग्रामीण रुग्णालयात होणार सुरू
परळी । वार्ताहर
परळी तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आरोग्य सह अन्य यंत्रणा कामाला लावून 48 तासात परळी ग्रामीण रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभा केले आहे. हे कोविड केअर सेंटर आज शुक्रवारी (दि.23) पासून कार्यान्वित होणार आहे.
परळी ग्रामीण रुग्णालयात सौम्य ते मध्यम तीव्रतेच्या कोरोना बाधित रुग्णांचे उपचार करता यावेत, यासाठी आवश्यक सामग्री दोन दिवसात उभारण्यात आली असून, यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेनंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते व इतरांनी आवश्यक ती कार्यवाही पार पाडली. दरम्यान या 50 बेडच्या व्यवस्थापनेसाठी आवश्यक असणार्या ऑक्सिजनची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, यांपैकी 20 बेड उद्या (दि. 23) रोजी तर उर्वरित 30 बेड येत्या दोन दिवसात रुग्णांसाठी उपलब्ध होतील. शिवाय रुग्णालयात दाखल होणार्या नियमित रुग्णांच्या उपचारांवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्षद शेख यांनी दिली आहे. परळीत सध्या समाज कल्याण विभागाच्या दोन वस्तीगृहामध्ये मिळून सौम्य व लक्षणे नसलेल्या 200 पेशंटची सोय करण्यात आली आहे. या शिवाय शहरातील सात डॉक्टरांनी आपल्या खाजगी रुग्णालयात करोना पेशंटवर उपचार सुरू केले आहेत. धनंजय मुंडे यांनी शहरातील डॉक्टरांची ही नियमित संवाद ठेवून या संकटात जास्तीत जास्त सेवा द्यावी असे आवाहन डॉक्टरांना केले आहे.
रुग्णांची केली विचारपूस
लोखंडी सावरगाव येथील दोन्ही इमारतींमधील कोविड केते सेंटरच्या सुविधांचाही धनंजय मुंडे यांनी आढावा घेतला.
यावेळी ना. मुंडेंनी कोविड वॉर्डात जाऊन प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधत त्यांची विचारपूस करत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.
स्वाराती व लोखंडीच्या रुग्णालया घेतला आढावा
आरोग्य यंत्रणेने सर्वात मोठे आव्हान समजून काम करावे
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयासह प्रत्येक रुग्णालयात दाखल होणार्या प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्वाचा आहे; या कठीण परिस्थितीत डॉक्टर्स व अन्य सर्व यंत्रणांनी आपला पूर्ण अनुभव, आपले कौशल्य पणाला लावावेत, कोरोनाच्या दुसर्या लाटेत उद्भवलेली ही परिस्थिती आटोक्यात आणणे हे आपल्या जीवनातील सर्वात मोठे आव्हान आहे, असे समजून प्रत्येकाने काम करावे असें आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
कोविड विषयक विविध समस्या व त्यावरील उपाययोजना यासंदर्भात ना. मुंडेंनी आज अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटर मध्ये भेट देऊन आढावा घेतला.स्वाराती रुग्णालयातील - बिल्डिंग मधील उर्वरित कामे चार दिवसांच्या आत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून घ्यावीत व ही संपूर्ण इमारत कोविड रुग्णांसाठी आरक्षित करून सोमवारपासून सुरू झालीच पाहिजे, असे सक्त निर्देश मुंडेंनी सार्वजनिक बांधकामचे अधिकारी व महाविद्यालय प्रशासनाला दिले आहेत.
स्वाराती रुग्णालयात आवश्यक ऑक्सिजन मिळवण्यासाठी औष्णिक विद्युत केंद्रातून शिफ्ट केलेला ऑक्सिजन प्लांट सोमवारच्या आत उभा राहील, याद्वारे 288 जम्बो सिलेंडर ऑक्सिजन दर दिवशी निर्माण होईल, या व्यतिरिक्त लागणार्या ऑक्सिजन ची व्यवस्था करणार्या कंपन्यांच्या अधिकार्यांशी धनंजय मुंडे यांनी बैठकीतून फोनवरून संवाद साधत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना केल्या आहेत. ऑक्सिजन, रेमडीसवीर इंजेक्शन आदींचा तुटवडा भासत असताना, या सुविधांचा योग्य वापर व्हावा, अपव्यय होऊ नये तसेच गरज असणार्या रुग्णांनाच ते दिले जावेत, याबाबत खबरदारी घेण्यात यावी अशा सूचनाही मुंडेंनी दिल्या. या बैठकीस आ. संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, स्वाराती चे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुकरे, उपजिल्हाधिकारी श्री. झाडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वाती भोर, उपअधीक्षक सुनील जायभाये, परळी थर्मलचे मुख्य अभियंता मोहन आवाड डॉ. चव्हाण, डॉ. बिराजदार यांसह स्वाराती च्या अभ्यागत मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
स्वाराती परिसरामध्ये उपलब्ध जागेत आणखी एक ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ असेही यावेळी मुंडे म्हणाले.बंद व्हेंटिलेटर सुरू करा, बायपॅप सह अन्य मशिन्स खरेदीची प्रक्रिया तातडीने राबवास्वाराती सह अन्य ठिकाणचे वापरात नसलेले किंवा बंद पडलेले व्हेंटिलेटर्स तातडीने सुरू करावेत, बायपॅप मशिन्स किंवा अन्य कोणतेही आवश्यक साहित्य खरेदीची प्रक्रिया तातडीने राबवून आवश्यक यंत्रना उभी करावी, ऑक्सिजनच्या उपलब्धतेनुसार बेड वाढवुन घ्यावेत असेही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी मुंडेंसह आ. संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, शिवाजी सिरसाट, विलास काका सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा केंद्रे, डॉ. चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार अ. र. पटेल यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते. लोखंडी सावरगाव येथे सुविधा वाढवल्यास आणखी बेड वाढविणे शक्य असून, त्यानुसार बेड वाढवावेत, व आवश्यक सामग्री उपलब्ध करून देण्यात यावी याबाबतचे निर्देश धनंजय मुंडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांना दूरध्वनीद्वारे दिले आहेत.
Leave a comment