विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांवर होणार कडक कारवाई
ठिकठिकाणी नाकाबंदी, भरारी पथके, ड्रोन कॅमेर्यांचाही राहणार ‘वॉच’
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात कोरोना समुह संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध जारी केलेेले आहेत;परंतु संचारबंदी असतानाही विनाकारण बाहेर फिरणारेही अनेक आहेत. दरम्यान आता ’ब्रेक द चैन’नुसार राज्य शासनाने 22 एप्रिल ते 1 मे या दरम्यान कडक अंमलबजावणीचे धोरण आखले आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. नव्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 22 एप्रिलपासून कडक अंमलबजावणीचे धोरण आखले आहे. संपूर्ण राज्यभर हे निर्बंध लागू राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घराबाहेर पडता येणार नाही. जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करुन तेथे चेक पोस्ट लावण्यात येणार आहेत. दरम्यान, पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी नव्या निर्बंधाच्या अंमलबजावणीसंदर्भात ठाणेप्रमुखांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणारे, मास्क न वापरणारे, सामाजिक अंतराचे पालन न करणारे, निर्बंधाचे उल्लंघन करुन हॉटेल, आस्थापना सुरु ठेवणारे तसेच नियमबाह्य खासगी प्रवासी वाहतूक करणार्यांवर कलम 144 नुसार कारवाई केली जाणार आहे. ठाणे हद्दीत गस्त वाढविण्याच्या सूचना असून ड्रोन कॅमेर्याद्वारेही ’वॉच’ ठेवण्यात येणार आहे.
विनाकारण घराबाहेर पडू नका-आर.राजा
शासन निर्देशानुसार गुरुवारपासून (दि.22) नवीन निर्बंधांची अंमलबजाववणी केली जात आहे. यासाठी आवश्यक त्या ठिकाणी नाकाबंदी, चेक पोस्ट लावण्यात आल्या आहेत. पोलीस ठाणे स्तरावर पेट्रोलिंग वाढविण्यात आली असून भरारी पथकेही नेमली आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी केले आहे.
Leave a comment