500 रेमडेसिवीरची खेप कर्जत-जामखेडला
बीडचे सत्ताधारी कसायाच्या भूमिकेत
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची मृत्यूशी झुंज चालू असताना जिल्ह्यातील रुग्णांसाठी विशेष इंजेक्शनचा साठा आणण्याचे तर दूरच परंतु जिल्ह्यासाठी आलेले इंजेक्शनचा साठा सत्ताधारी पुढार्यांच्या दबावाखाली येऊन अधिकार्यांनी परस्पर कर्जत-जामखेडला पाठवला. शेकडो रुग्ण इंजेक्शन अभावी तडफडत असताना जिल्ह्यातील सत्ताधारी पुढार्यांनी कसायाची भूमिका घेऊन येथील रुग्णांना वार्यावर सोडले आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून सामान्य रुग्णांच्या जीविताशी होत असलेल्या या घृणास्पद कृतीचा बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजेंद्र मस्के यांनी निषेध व्यक्त केला आहे.
रेमडेसिवीरच्या भीषण टंचाई बरोबर रुग्णांना ऑक्सिजनचाही तुटवडा भासत आहे. अनेक रुग्णांना बेड मिळत नाहीत. अशा बिकट परिस्थितीत जनता धैर्याने कोरोनाशी सामना करत असताना शासन आणि प्रशासन मात्र हलगर्जीपणा करते आहे. जिल्ह्यातील कोरोना व्यवस्थापनातील कारभार अत्यंत अनागोंदीचा व ठिसूळ झाला आहे. आरोग्य प्रशासनामार्फत कोरोना रुग्णांची हेटाळणी आणि हाल चालू आहेत. तीन दिवसाला एकदा इंजेक्शन वाटप केले जाते 50-60 पेक्षा जास्त रेमडेसिवीर आलेले नाहीत. शिवसेनेचे सत्ताधारी नेते यांनी 2800 इंजेक्शन दिल्याचा दावा केला तर पालकमंत्र्यांनी 250 इंजेक्शन देऊ केले व देण्यापूर्वीच पाठ थोपटून गावात नगारा वाजवला हे रेमडेसिवीर आले असतील तर गेले कुठे याचा हिशोब आरोग्य प्रशासनाने दिला पाहिजे. अनेक रुग्णांचा एचआरटीसी स्कोर 10 ते 16 पर्यंत गेला आहे. ऑक्सिजन लेवल 80 पर्यंत आलेली आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून रेमडेसिवीरच्या प्रतीक्षेत आहेत. अशा गंभीर रुग्णांनाही इंजेक्शन दिले जात नाही. ज्याचा वशिला तगडा त्याला रेमडेसिवीर मिळत असल्याने अनेकांचे जीव टांगणीला लागले आहेत. मृत्युच्या दाढेत अडकलेल्या रुग्णांशी हा जीवघेणा खेळ केवळ सत्ताधार्यांच्या हस्तक्षेपामुळे चालू आहे. रेमडेसिवीरच्या वाटपातील हस्तक्षेपामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले तर त्यांचा तळतळाट तिघाडी वाटून घेणार का? रुग्ण, नातेवाईक आणि सामान्य जनतेमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून अशा घटनांमुळे प्रशासनावरील विश्वास कमकुवत होत आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने दाखल घेऊन आरोग्य प्रशासनातील अनागोंदी कारभार सुव्यवस्थित करावा इंजेक्शन वाटपात पारदर्शकता आणून वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार रेमडेसिवीर वाटप करावे अशी मागणी राजेंद्र मस्के यांनी केली आहे.
रुग्णांना कमी दाबाने ऑक्सिजन पुरवठा
जिल्हा रुग्णालयातील कोव्हीड रुग्णांना कमी दाबाने ऑक्सिजनचा पुरवठा होतो आहे अशी माहिती काही रुग्णांनी व नातेवाईकांनी दिली आहे. नाशिकच्या दुर्दैवी घटनेची दखल घेऊन बीड जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची तज्ञांमार्फत तपासणी केली पाहिजे. जेणे करून दुर्दैवी घटनांची आवृत्ती होणार नाही.
Leave a comment