मृत्यूबाबत नातेवाईकांचे आरोप ; तर प्रशासनाकडून इन्कार
अंबाजोगाई । वार्ताहर
अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयातील कोव्हीड कक्षात बुधवारी (दि.21) सात जणांचे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. दरम्यान दिवसभरात 14 जणांचे मृत्यू झाले. दुपारी दिड तासात सात जणांचे झालेले मृत्यू हे केवळ ऑक्सिजन अभावीच झाले आहेत असा आरोप मयत, रूग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर झालेले मृत्यू हे गंभीर आजाराचे व जास्त वयाचे रूग्ण असल्याने झाले असा दावा प्रसासनाने केला आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय रूग्णालयात गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत.बुधवारी दिवभरात 14 कोरोनाच्या रूग्णांचे निधन झाले आहे.तर दुपारी 12.45 ते 2.15 या वेळेत दिड तासात सात जणांचे मृत्यू झाल्याने सर्वञ खळबळ उडाली आहे.कोरोना कक्षाच्या अतिदक्षता विभागातील पाच,तर वार्ड क्रमांक तीन मधील दोन अशा सात रूग्णांचा दिड तासात मृत्यू झाला.झालेले मृत्यू हे ऑक्सिजन अभावी झाले आहेत असा आरोप रूग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. स्वाराती मधील कोरोना रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे.केवळ दिड तासात सात मृत्यू स्वाराती रूग्णालयात बुधवारी (दि.21) दुपारी दिड तासात सात मृत्यू झाले. त्यापैकी वॉर्ड क्र.3 मध्ये दोन मृत्यू आहेत.या वार्डात संशयीत रूग्ण असतात.तर वॉर्ड क्र.1 मध्ये असे मिळून पाच मृत्यू झाले आहेत. स्वाराती रूग्णालयात कोरोना संशयित रूग्णाचा मृत्यू झाल्यास त्याची आरटीपीसीआर चाचणी करून निगेटीव्ह आल्यास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो.आजच्या घटनेतील मयत रूग्णांची मात्र घाईगडबडीत अँटीजेन चाचणी करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविल्याने प्रशासन काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय उपस्थित नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
गंभीर आजाराने मृत्यू झाले : प्रशासनाचा दावा
बुधवारी रात्री 12 ते आता पर्यंत कोरोनाच्या 11 जणांचा मृत्यू झाला आहे.झालेले मृत्यू हे दमा, हायपरटेंशन,उच्च रक्तदाब व शारीरिक व्याधींमुळे झाला आहे. बहुतांश रूग्णांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे. रूग्णालयातील ऑक्सिजन व्यवस्था सुरळीत आहे अशी माहिती स्वारातीचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांनी दिली.
मृत्यूंना सर्वस्वी रूग्णालय प्रशासन जबाबदार
रूग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि ऑक्सिजन मुबलक प्रमाणत उपलब्ध असताना देखिल सप्लाय बंद पडून आमच्या रूग्णाचा मृत्यू झाला.वेळोवेळी अधिष्ठातांना कॉल केला.परंतु,त्यांनी प्रतिसाद दिला नाही.या मृत्यूंना सर्वस्वी रूग्णालय प्रशासन जबाबदार आहे अशी प्रतिक्रिया एका रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.
Leave a comment