बीड । वार्ताहर
रेमडेसिवीर इंजेक्शनचा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात मोठा दुष्काळ आहे. या इंजेक्शनमुळे अनेकांना जीवदान मिळाले आहे. तर न मिळाल्याने अनेकांचे जीव गेले आहेत. रेमडेसिवीरमुळे बीड जिल्ह्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयात रुग्ण तडफडत असताना आ.रोहित पवारांना खुश करण्यासाठी एका राजकीय पुढार्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांच्यावर दबाव आणत जवळपास 500 रेमडेसिवीर कर्जत-जामखेडला दिल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रामध्ये दबक्या आवाजात ऐकण्यास मिळत आहे. गेल्या आठवड्यामध्ये हे इंजेक्शन दोन टप्प्यात दिल्याचेही बोलले जात आहे. मात्र या संदर्भात आरोग्य प्रशासनातील अधिकार्यांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. प्रत्येकजण कानावर ठेवत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये आता पाच हजार कोरोना बाधित रुग्ण शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार आणि तुटवडा यामुळे सदरील इंजेक्शन हे प्रशासनाच्या वतीनेच रुग्णांना देण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात इंजेक्शनचा साठा करण्यात येवू लागला. सुरुवातीला एवढी टंचाई भासत नव्हती, मात्र रुग्ण वाढल्याने मागणीही वाढली. मराठवाड्यात औरंगाबाद, बीड आणि नांदेड हे तीन जिल्हे कोरोना रुग्णांमध्ये आघाडीत आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रात पुण्यानंतर नगरची परिस्थिती विदारक आहे. कर्जत-जामखेड आणि इतर तालुक्यांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शासनाच्या वतीने बीड जिल्हा रुग्णालयाला दोन आठवड्यापूर्वी रेमडेसिवीर प्राप्त झाले. त्याच दरम्यान आ.रोहित पवार यांच्या मागणीवरुन बीड जिल्ह्यातील सत्ताधारी पुढार्याने रोहित पवारांना खुश करण्यासाठी बीड जिल्ह्यातील रुग्णांचा विचार न करता कर्जत-जामखेड व इतर तालुक्यातील विशेषत: आ.रोहित पवार यांच्या मतदारसंघातील रुग्णांसाठी हे इंजेक्शन पाठवल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या संदर्भात रेमडेसिवीर इंजेक्शन नियंत्रणासाठी जी समिती स्थापन करण्यात आली, त्या समितीतील अधिकार्यांनाही विचारणा करण्यात आली, मात्र सर्वांनीच कानावर हात ठेवले. नेमके खरे काय? हे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनाच माहित आहे. परंतु काहीच न बोलणे आणि फोन न उचलणे यामुळे सर्व काही धकून गेले आहे. या संदर्भात जिल्हाधिकार्यांनीच चौकशी करावी आणि सत्य जनतेसमोर आणावे अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Leave a comment