चौका-चौकात गर्दी कायम; बाजारात खरेदी विक्री सुद्धा सुरू
परळी । वार्ताहर
जिल्हाधिकारी बीड यांनी तातडीने राज्य शासनाच्या सुचनेनुसार तातडीने कडक निर्बंधांचे दिशा निर्देश जारी करण्यात आल्यानंतर परळी शहरात या निर्बंधाचा अक्षरशः फज्जा उडाला. आज सोमवार पासून सकाळी सात ते अकरा असा वेळ देण्यात आला होता. प्रत्येक पाऊलावर पाच पेक्षा अधिक किराणा आणि मेडिकल स्टोअर असल्याने जणू काही संपूर्ण बाजारपेठ चालूच होती असे चित्र दिसून येत होते. मोंढा, अरुणोदय मार्केट रोड, हैदराबाद बँक रोड, टावर, किराणा लाईन भाजी मार्केट या भागात बर्यापैकी गर्दी दिसून येत होती. भाजी बाजारात सुद्धा चांगलीच गर्दी पहायला मिळत होती. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले असले तरी देखते रहो... एवढेच त्यांचे धोरण होते की काय ? असा प्रश्न निर्माण झाला.
परळी शहरात कडक निर्बंधानंतर बाजारपेठ शांत असेल असा अंदाज आज अक्षरशः फोल ठरला आहे. दाटी वाटीने आज संपूर्ण परळी शहरात जागो जागी गर्दी दिसून येत होती. फळ, भाज्या यांचे गाडेही मोठ्या प्रमाणात जागो जागी पहायला मिळत होते. वास्तविक पाहता अत्यावश्यक सेवा असलेल्या किराणा, मेडीकल यांनाच दुकान उघडण्याची परवानगी आहे. इतर व्यावसायिकांनी आज आपली दुकाने उघडली नसली तरी बाजारातील मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत होती. त्यामुळे कडक निर्बंध कोणी पाळायचे ? नियम पाळले जातात किंवा नाही हे तपासणार कोण ? असाही प्रश्न आहे.
दरम्यान परळी शहरात कोरोना प्रार्दुभाव वाढत असून काल रविवारी परळी शहरात 59 रूग्ण सापडले आहेत. या सर्वांना उपचारासाठी परळी व अंबाजोगाई येथील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे. शहरातील वाढती कोरोना रूग्ण संख्या लक्षात घेवून शासनाचे नियम पाळत रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करण्याची गरज आहे. शहरात दोन पोलीस ठाणे आहेत परंतू वाढत्या गर्दीवर व बिन बोभाट विनाकारण रस्त्यावर फिरणार्या नागरिकांची साधी चौकशीही केली जात नाही.
Leave a comment