आज कर्णधार विरुद्ध उपकर्णधार
आयपीएल धमाका आजपासून चेन्नईला सुरु होतोय. मुंबई विरुद्ध बंगलोर असा सामना रंगणार आहे. सहाव्यांदा जिंकायच्या इर्षेने मुंबई मैदानात उतरेल तर पहिलं अजिंक्यपद मिळवण्याच्या दृष्टीने कोहली आणि त्याचा संघ सर्वस्व पणाला लावेल. मुंबईने कागदावरची शक्ती प्रत्यक्ष मैदानावर सातत्याने दाखवली आहे. सर्व संघ कागदावर लिहिले तर ह्यावेळेस सुद्धा मुंबईचा संघ सर्वाधिक संतुलित,प्रतिस्पर्ध्याच्या छातीत धडकी भरवणारा आणि कोणतीही आणीबाणीची परिस्थती यशस्वी रित्या हाताळू शकेल ह्याची खात्री देणारा वाटतो.
मुंबईच्या संघात सलामीवीर,मध्यक्रम, अष्टपैलू,फास्ट बॉलर्स,स्पीन्नर्स,यष्टीरक्षक सर्वांनीच स्वतः ला सिद्ध केलय. एकंदरीत मुंबईचा संघ आयपीएल चा क्लाइव्ह लॉइडचा संघ म्हणायला हरकत नाही.बंगलोरचा संघ केवळ कोहली आणि डीविलीअर्स वर अवलंबून न राहता सांघिक कामगिरी करतो का ते बघायचे.
क्रिकेट बॅट्समनचा खेळ आहे हे टी20 मध्ये सत्य आहे.(वैविध्यपूर्ण खेळपट्ट्या आणि डीआरएस मुळे टेस्ट क्रिकेट मध्ये बॉलर्स ला समान संधी मिळत आहे असं आता नक्की म्हणता येईल).जिममध्ये जाऊन तयार केलेले पिळदार शरीर,जाड आणि जड बॅट्स,पूर्ण बॅट्समनधारजिण्या खेळपट्ट्या ह्यामुळे सिक्सर मारण्यात आता कुठली रिस्कचं राहिलेली नाही.
पूर्वी सिक्सर हा एक अकॅडेमिक शॉट होता. तो क्रिकेटमध्ये असतो आणि मारला तर सहा धावा मिळतात एव्हढच पुस्तकी ज्ञान घेऊन बॅट्समन बॅटिंगला जायचे. तो ट्राय करण्याचा विचार देखील बॅट्समन करत नसत.मुंबईहून पुण्याला जाताना जसं मध्येच बंगलोर 900 कि. मी.असा बोर्ड दिसतो आपण तो नुसता बघतो आणि पुढे जातो.
आपल्याला बंगलोरला काही जायचे नसते.तसेच सिक्सरचे होते. सहा धावा फक्त माहित होत्या.कुणी नादी लागत नसे.विजय मांजरेकरांनी तर 55 टेस्ट खेळून सुद्धा एकही सिक्सर मारली नव्हती.गावस्करने सुद्धा करिअरच्या शेवटी शेवटी सिक्सर आजमावून पाहिली होती. पण टी 20 हे सिक्सर चेच क्रिकेट आहे.आता टी20 मध्ये चौकार ही चहाची टपरी आहे तर सिक्सरला थ्री स्टार हॉटेलचा दर्जा आहे.
जो सर्वाधिक सिक्सर खेचतो तो किंग. मग साहजिकच मॅच विनर्स कोण असतात? लांब लांब आणि सातत्याने सिक्सर खेचणारे बॅट्समन? चूक. सहज सिक्सर मारता येत असल्या तरी शकलेनी, धुर्तपणे,वैविध्याने सिक्सर रोखून धरणारे गोलंदाज हेच मॅच विनर्स. बॅट्समन च्या खेळात मॅच जिंकून देतात ते बॉलर्सच.पोवर प्ले मध्ये जबाबदारी घेणारे,मधल्या ओव्हर्स मध्ये विकेट्स काढणारे,डेथ ओव्हर्स मध्ये बॅट्समनला जखडून ठेवणारे बोलर्सच मॅच जिंकून देतात.
बुमराह आणि ट्रेंट बोल्ट हे सैनी आणि सिराज पेक्षा उजवे आहेत. बंगलोरचे सुंदर,झँम्पा आणि चहल मुंबईच्या स्पीन्नर्स पुढे उजवे वाटतात.त्यामुळे दोन चांगल्या संतुलित संघाचा सामना आहे. सहज सिक्स मारता येत असल्या तरी'सिक्स है तो रिस्क है' हा मंत्र प्रत्यक्षात उतरवू शकणारे बॉलर्स आयपीएल मध्ये सर्वात महत्वाची कामगिरी करणार.
लेट द शो बिगीन. विश यु ऑल द फन.
कोरोनाचे सावट, पण…
महाराष्ट्रासह देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशात दर दिवशी एक लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. आयपीएलवरही कोरोनाचे सावट आहे. काही खेळाडूंना, संघातील इतर सदस्य आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील ग्राऊंड स्टाफपैकी काहींना कोरोनाची बाधाही झाली. मात्र, या गोष्टीचा आयपीएलवर परिणाम होणार नाही, हे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. तसेच मुंबईत सामने ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.
यंदाच्या आयपीएलला विशेष महत्व
- यंदाच्या आयपीएलला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यावर्षी भारतामध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यामुळे सर्वच खेळाडूंचे यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य असेल. मोसमाची सुरुवात गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होणार आहे. सलामीची लढतच रोहित शर्माचा मुंबई आणि विराट कोहलीचा बंगळुरू या संघांमध्ये होणार असल्याने चाहते या सामन्याची आणि यंदाच्या मोसमाच्या आतुरतेने वाट पाहत आहे.
-
-
पहिला सामना आज सायं. 7.30 वाजता होणार सुरु
- 120 देशांत थेट प्रक्षेपण; भारतात 8 भाषांत समालोचन होईल पण मैदानावर चाहते नसतील.
चौकार-षटकारांची आयपीएल स्पर्धा शुक्रवारपासून सुरू होईल. ८ संघ खेळतील. पहिला सामना भारतीय कर्णधार कोहलीचा बंगळुरू संघ आणि उपकर्णधार रोहितच्या मुंबई संघादरम्यान होईल.
सामन्याआधी कोहलीचे ‘चक दे’ शैलीत प्रेरणादायी भाषण
विराट कोहलीने प्रशिक्षण सत्रात ‘चक दे’ स्टाइलमध्ये भाषण दिले. तो म्हणाला,‘जे नवे खेळाडू आरसीबीत आले आहेत, त्यांचे स्वागत. या हंगामातही संघाची ऊर्जा शानदार राहील. मैदानावर आपल्या वेळेचा योग्य उपयोग कराल, अशी मी आपणा सर्वांकडून अपेक्षा करतो. आपण चांगल्या ऊर्जेसह खेळत आलो आहोत. त्यात कुठलाही बदल होणार नाही. आपण सर्व जण मिळून खूप काही नवे करू शकतो.’
विशेष : ही स्पर्धा टी २० वर्ल्ड कपची निवड चाचणीच समजा
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी २० वर्ल्ड कप आहे. भारताला आयपीएलनंतर निवडक टी २० खेळायचे आहेत, त्यामुळे ही स्पर्धा निवड चाचणीप्रमाणेच असेल. टी २० टीममधून बाहेर होण्याच्या मार्गावर असलेले शिखर धवन आणि कुलदीप यादव यांचे भविष्य आयपीएलद्वारेच निश्चित होणार आहे.
बदललेल्या नियमांसह होत आहे लीग
- ९० मिनिटांत डाव संपवावा लागेल.
- मॅच संपल्यावर एक तासापर्यंत सुपर ओव्हर होऊ शकेल.
- शॉर्ट रन थर्ड अंपायर तपासेल
- नो-बॉलचा निर्णय थर्ड अंपायर बदलू शकेल.
- मैदानावरील पंच साॅफ्ट-सिग्नल देऊ शकणार नाही.
एक्स फॅक्टरच्या या ५ खेळाडूंवर नजर
ऋषभ पंत : दिल्ली संघाचा कर्णधार. मागील स्पर्धेत चांगला खेळला नाही.
ईशान किशन: मागील हंगामात सर्वाधिक ३० षटकार. वर्ल्ड कप संघात येऊ शकतो.
प्रसिद्ध कृष्णा: गती, उसळी दोन्ही आहेत. इंग्लंडविरुद्ध चांगली गोलंदाजी.
सूर्यकुमार : मोठे फटके मारतो. २०१८ मध्ये मुंबईसाठी सर्वाधिक १४१६ धावा केल्या.
देवदत्त पड्डीकल: २०२० मध्ये कोहली व डिव्हिलियर्सपेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
आठ संघांचे कर्णधार कोण? कुणाला किती अनुभव? वाचा सविस्तर...
महेंद्रसिंह धोनी
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात अनुभवी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे. धोनीने 177 सामन्यात संघांचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी धोनीने 105 सामने जिंकले आहेत, तर 71 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. एक सामना अनिर्णित आहे.
विराट कोहली
दुसर्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने आरसीबीकडून 112 सामने कर्णधार म्हणून खेळले आहेत. त्यापैकी 50 सामन्यात विजय मिळवला तर 56 सामन्यात संघाचा पराभव झाला आहे. दोन 2 सामने बरोबरीत आहेत आणि 4 सामने अनिर्णीत आहेत.
रोहित शर्मा
रोहित शर्मा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणावा लागेल. तिसर्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. त्याने 106 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी 61 सामने संघाने जिंकले आहेत, तर 43 सामने संघाने गमावले आहेत. दोन सामने टाय झाले आहेत.
डेवि़ड वॉर्नर
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरकडे 63 सामन्यामध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्यापैकी 34 सामने संघाने जिंकले आहेत आणि 28 सामने गमावले आहेत. तर एक सामना टाय झाला.
केएल राहुल
पाचव्या क्रमांकावर केएल राहुल आहे. केएल राहलने पंजाबचं नेतृत्व करताना 14 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि सात सामन्यात पराभव झाला आहे. तर एक सामना टाय देखील झाला आहे.
इयॉन मॉर्गन
इयॉन मॉर्गन मॉर्गन सहाव्या क्रमांकावर असून तो केकेआरचा सात सामने कर्णधार राहिला आहे. त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत आणि 4 सामने गमावले आहेत. तर एक सामना टाय झाला आहे.
संजू सॅमसन आणि ऋषभ पंतला कर्णधारपदाचा अनुभव नाही
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत हे दोघे एकाही सामन्याचा कर्णधार राहिले नाहीत. या मोसमात ते पहिल्यांदा त्यांच्या संघांचं नेतृत्व करणार आहे. आयपीएलच्या विजेतेपदाविषयी बोलायचं तर या यादीमध्ये रोहित शर्मा टॉपवर आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल विजेतेपदावर नाव कोरलं आहे. चेन्नईने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात तीन वेळा आणि डेविड वॉर्नरच्या नेृतृत्वात हैदराबादने एकदा विजेतेदावर नाव कोरलं आहे.
Leave a comment