मनमिळावू स्वभावामुळे अधिकारी आणि पत्रकारांमध्ये होते लोकप्रिय
पुणे । वार्ताहर
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे आज पहाटे कोरोनानं निधन झाले. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सरग यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. पण उपचारादरम्यान, वाढलेली त्यांची शुगर शेवटपर्यंत कमी न झाल्याने अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ते 54 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
नाशिकमधील नांदगाव हे त्यांचे मूळगाव, तर औरंगाबादला त्यांचे पत्रकारितेचे शिक्षण झाले. प्रारंभी पत्रकारिता केल्यानंतर ते शासकीय सेवेत रूजू झाले. बीड, परभणी, नगर आणि पुणे या चार जिल्ह्यात त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम पाहिले. अतिशय मनमिळावू स्वभाव आणि कार्यतत्परता या गुणांमुळे ते अधिकारी वर्गासोबतच तमाम पत्रकारांमध्ये खूप लोकप्रिय होते.
राजेंद्र सरग यांना विविध विषयांवर व्यंगचित्र काढण्याचाही छंद होता. अनेक वर्षांपासून काही दैनिक, साप्ताहिक तसंच दिवाळी अंकांमधून त्यांची व्यंगचिञ प्रसिद्ध होत असत. बालगंधर्वला त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शनही भरले होते. आताही गेल्या वर्षभरापासून कोरोना शासकीय आकडेवारी आणि उपाययोजनांची माहिती ते न चुकता पत्रकारांपर्यंत पोहोचवायचे आणि अगदी त्यांच्यावर उपचार सुरू असतानाही ते रोज संध्याकाळी न चुकता पुणे जिल्हा माहिती अधिकारी ग्रुपवर कोरोनाच्या आकडेवारीचा संदेश पाठवायचे. पण दुर्दैवाने त्याच कोरोनाने आज त्यांचा बळी घेतला आहे. 29 एप्रिलचा त्यांचा रात्री 9:32 मिनिटांचा शेवटचा संदेश पत्रकार मित्रांना खूप हळवा करून करून गेला.
गेल्याच आठवड्यात त्यांची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आल्यानंतर प्रारंभी त्यांनी हडपसरच्या आधार हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. पण प्रकृती खालावताच त्यांना ससूनच्या आयसीयूत हलवण्यात आलं. त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत, यासाठी पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्वत: डॉक्टरांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार डॉक्टरही शर्थीचे प्रयत्न करत होते, पण अखेर हे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले.
उपमुख्यमंञी अजित पवार यांनी सरग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
राजेंद्र सरग यांनी नवीन,जुना,लहान, मोठा पत्रकार असा कधीच भेदभाव केला नाही. प्रत्येकास सहकार्य केले. त्यांचे प्रशासकीय काम पाहून येत्या आठवड्यात त्यांचे उपसंचालक पदावर प्रमोशन होणार होते. पण त्या आधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सरग यांच्या प्रकृतीसाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. मनमिळावू, सतत दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून येणार माणूस असा सरग यांचा नावलौकिक होता. त्यांच्या निधनामुळे माहिती खात्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सरग यांचा माध्यम क्षेत्राशी मोठा संपर्क होता. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. पंधरा दिवसात त्यांना प्रमोशन मिळणार होते. पण तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
सरग यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अनेकवेळा डॉक्टरांशी संपर्क साधून मदत करण्याच्या सूचना केल्या. मात्र कोरोनापुढे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सरग यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान, कोरोना काळात चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांचा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला होता
राजेंद्र सरग यांचा अल्पपरिचय
- राजेंद्र सरग हे पुणे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत
- राजेंद्र सरग यांच्याकडे उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार
- त्यांच्याकडे उत्तम वार्तांकन कौशल्य , संगणकावर प्रभुत्व, व्यापक जनसंपर्क होता
- हसतखेळत काम करण्याची वृत्ती आणि सतत कार्यरत राहण्यातच खरा आनंद असतो हे आपल्या आचरणातून ते सदैव दाखवतं.
- राजेंद्र सरग चांगले व्यंगचित्रकार होते.
Leave a comment