लाॅकडाऊनची वेळ व्यापारी, ग्राहकांच्या गैरसोयीची ; वेळेचा पुनर्विचार करावा
हातावर पोट असणारांना फटका बसणार नाही याचीही दक्षता घ्या
बीड । वार्ताहर
लाॅकडाऊन मध्ये जिल्हा प्रशासनाने सकाळी केवळ दोन तासांची दिलेली शिथिलता ही व्यापारी आणि ग्राहक या दोन्हींच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीची असून यामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने सदरची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. दरम्यान, सध्याच्या लाॅकडाऊनचा फटका हातावर पोट असणारांना बसू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी व त्या दृष्टीने उपाय योजना कराव्यात असेही त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्हयात लाॅकडाऊन कडक करण्यात आला आहे, तथापि या निर्णयाला सर्व सामान्य जनता व व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. संपूर्ण लाॅकडाऊन ऐवजी निर्बंध कडक करावेत, अशी जनतेची मागणी असताना प्रशासनाने याचा विचार केलेला नाही. व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी दिलेली सकाळी ७ ते ९ वा. ही वेळ हास्यास्पद असून त्यांच्या व ग्राहकांच्या दोन्हीच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीची आहे. इतक्या कमी वेळेत काहीच होणार नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. कोरोनामुळे अगोदरच बाजारपेठ थंड आहे, त्यातच प्रशासनाने अशा प्रकारचे तुघलकी निर्बंध लावून नयेत. त्यामुळे त्यांच्या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने दिलेल्या वेळेचा पुनर्विचार करावा आणि व्यापाऱ्यांना वेळ वाढवून द्यावा अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.
कडक लाॅकडाऊन मुळे रोजंदारी काम करणारे आणि ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांनाही या नियमांचा फटका बसणार आहे त्यामुळे प्रशासनाने त्यांचीही दक्षता घेऊन उपाय योजना कराव्यात असेही पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.
Leave a comment