सर्व प्राचार्यांनी विद्याथी-पालकांना माहिती देण्याच्या सूचना
परीक्षा व मुल्यवमापन मंडळाची महत्वाची माहिती
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिल 2021 या कालावधीत जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र यापूर्वीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांना सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लॉकडाऊन जरी जारी केला गेला असला तरी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पूर्व नियोजीत वेळापत्रकाप्रमाणेच पार पडणार आहेत. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी संबंधित विद्यार्थी, पालक, अध्यापक आणि कर्मचार्यांना ही बाब स्पष्टपणे अवगत करुन द्यावी अशा सूचना विद्यापीठ परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या संचालकांनी दिली आहे.
याबाबत बुधवारी (दि.24) विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाने एक विस्तृत परिपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील ऑक्टोबर,नोव्हेंबर 2020 च्या मार्च 2021 मध्ये होणार्या सर्व पदवी (अव्यावसयिक अभ्यासक्रम) अभ्यासक्रमांच्या परीक्षा दि.16 मार्च 2021 पासून सुरु झालेल्या आहेत. दरम्यान बीड जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात 25 मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन जारी केला आहे. परंतु सध्या विद्यापीठाच्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु आहेत. या परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरु राहतील. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही महत्वाची माहिती बीड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सर्व संबंधित विद्यार्थी, पालक, अध्यापक व कर्मचार्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करुन परीक्षा घेण्यात याव्यात.या कालावधीमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करावे अशा सूचनाही प्राचार्यांना देण्यात आल्या आहेत.
Leave a comment