मुंबई | प्रतिनिधी
सचिन वाझे प्रकरणी चर्चेत आणि पर्यायाने वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर आज महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, या अधिकाऱ्यांसोबतच इतरही पोलीस अधिकाऱ्यांची बदली देखील करण्यात आली आहे. यसंदर्भात अनिल देशमुख यांनी ट्वीटरवर सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्याशिवाय, संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर परमबीर सिंग यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. हेमंत नगराळे हे १९८७च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी याआधी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, तसेच महाराष्ट्राच्या महासंचालकपदाची जबाबदारी देखील पार पाडली आहे.
अँटिलियाबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार आणि त्यात सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या या प्रकरणाची चौकशी सुरू असताना कारचा मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाला आणि हे प्रकरण अधिकच वाढलं. या प्रकरणामध्ये नंतर मुंबई पोलीस सीआयूचे अधिकारी सचिन वाझे यांचं देखील नाव समोर आलं. सचिन वाझे यांना या प्रकरणी निलंबित देखील करण्यात आलं आहे. एनआयएकडून सचिन वाझेंची सध्या चौकशी सुरू असून यामार्फत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, सचिन वाझे थेट ज्यांना रिपोर्ट करत होते आणि ज्यांच्या जवळचे मानले जातात त्या परबीर सिंग यांच्याकडे देखील आरोपाची बोटं वळायला लागली. या पार्श्वभूमीवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी राज्य सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचं आता सांगितलं जात आहे.
काय आहे गृहमंत्र्यांचे ट्विट
कोण आहेत हेमंत नगराळे
- मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सन 1987 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत.
- हेमंत नगराळे हे 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त होते.
- 2018 मध्ये त्यांची नागपूरला बदली झाली.
- हेमंत नगराळे पोलीस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून काम करत होते.
- हेमंत नगराळे यांचा अजून १ वर्षे ७ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.
- नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना हेमंत नगराळे यांनी बँक ऑफ बडोदा या बँकेवरील दरोड्याची उकल दोन दिवसात केली होती. हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते.
हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्त झाल्यामुळे रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची दबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी का?
1. देशातील सर्वात सक्षम पोलीस दल म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबई पोलिसांनी अंबानी बॉम्ब धमकी प्रकरणात अनेक गंभीर चुका केल्या आहेत, हे एनआयएच्या चौकशीत पुढे येत आहे. ज्यामुळे मुंबई पोलिसांची मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे. म्हणूनच मुंबई पोलीस प्रमुखांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झालं होतं.
2. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत ही माहिती कशी पोहोचली? पोलिस दलातील आजही अनेक अधिकारी या प्रकरणातून फडणवीस यांना माहिती पोहोचवत असल्याची बाब समोर आली आहे. मनसुख हिरण यांच्या मृत्यूपासून ते मानसुखच्या पत्नीच्या जबाबापर्यंत सर्व माहिती लीक झाली. हा प्रश्न सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पडला होत. यातही पोलीस आयुक्तांचे काहीच नियंत्रण नाही ते स्पष्ट झालं होतं.
3. गृहमंत्रालय राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे शरद पवार आपली प्रतिमा बिघडू देऊ इच्छित नाही. अशा परिस्थितीत तातडीने डॅमेज कंट्रोल म्हणून पोलीस आयुक्तांना हटवण्याचा विचार केला होता.
4. अंबानी धमकी प्रकरणामुळे देश आणि विशेषत: महाराष्ट्राच्या गुंतवणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. अंबानींच्या सुरक्षेच्या वादामुळे परदेशी गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. म्हणूनच, पोलीस आयुक्तांची उचलबांगली करुन कडक संदेश देण्याचा प्रयत्न सरकारचा असेल.
Leave a comment