कोट्यवधीच्या कापूस गठाणी जळून खाक
बीडसह जालना,औरंगाबाद अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
बीड । वार्ताहर
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जप्ती पारगाव (ता.बीड) नजीक असलेल्या राज वेअरहाऊसला मंगळवारी (दि.2) पहाटे भीषण आग लागली. या आगीत तब्बल 70 कोटी रुपयांच्या कापसाच्या गठाण जळून भस्म झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान रात्री 12 वाजण्याच्या सुमारास लागलेली आग मंगळवारी दुपारपर्यंत सुद्धा आटोक्यात आली नव्हती. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न सुरु ठेवले. परिसरातील शेतकरी,ग्रामस्थांची घटनास्थळी गर्दी झाली होती.
बीड व गेवराई तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जप्ती पारगाव परिसरात राज वेअर हाऊस आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, या ठिकाणी शासनाने खरेदी केलेल्या तब्बल 21 हजाराहून अधिक कापूस गठाणी आणि खाजगी व्यापार्यांच्या सात हजार कापूस गठाणी ठेवण्यात आल्या होत्या. त्याची किमंत जवळपास 70 कोटींच्या आसपास असल्याची सूत्रांनी माहिती आहे. या वेअरहाऊसला मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली, तसेच चाळीस हजार स्वेअर फुटचे गोडावून या आगीत जळून खाक झाले आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीचे स्वरुप इतके भीषणहोते की, बीड जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या बंबासह शेजारच्या जालना व औरंगाबाद जिल्ह्यातून बंब मागवण्यात आले. अग्निशामक दलाचे एकूण 25 ते 30 बंब आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत राहिले. अखेर ही आग आटोक्यात आणण्यात आली. घटनास्थळी परिसरातील शेतकरी नागरिकांची गर्दी झाली होती. या आगीचे लोळ दुरपर्यंत पसरले होते. भीषण आगीमुळे परिसरातीला नागरिक भयभीत झाले.
आग लागली की लावली..?
दरम्यान ही आग लागली की लावली याबाबत जोरदार चर्चा होत असून याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.यापैकी किती मालाचा विमा काढलेला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.
वेअरहाऊसचा चालकाचा निष्काळजीपणा भोवला?
रक्ताचे पाणी करुन शेतकर्यांनी पिकवलेल्या कापसाच्या गठाणी जळाल्याने प्रचंड मोठे नुकसान झाले. वेअरहाऊस मालकांनी निष्काळजीपणा केल्याचेही स्पष्ट होत आहे. संबंधित वेअरहाऊसच्या ठिकाणी मॅन पॉवर आणि आग विझवण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने वेअरहाऊसला लागलेली आग वाढत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. कोट्यवधी रुपयांच्या कापसाच्या गठाणी ठेवलेल्या वेअरहाऊस चालकांकडून या साध्या साध्या नियमांचे पालन झाले असते तर इतकी प्रचंड मोठी हानी झालीच नसती अशा प्रतिक्रियाही नागरिकातून व्यक्त झाल्या.
Leave a comment