बीड । वार्ताहर

आगामी पन्नास वर्षांचे नियोजन करण्यासाठी तत्कालीन मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी सतत मंत्रालयाचा उंबरठा झिजवून संबंधित मंत्र्यांची अहमहमीका स्विकारुन बीड शहरासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जवळपास 450 कोटींचा निधी मंजुर करुन आणला. त्यातील अमृत अटल पेयजल योजना, भूयारी गटार योजना आणि शहरातील प्रमुख मार्गावरील रस्ते यांच्या कामाचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्याच उपस्थितीत मोठा गाजावाजा करुन झाला.शहराचे स्वरुप बदलेल,सुंदर शहर, स्वच्छ शहरचे स्वप्न बीडकरांना वास्तवात पहायला मिळेल असे चित्ररंजन त्यावेळी केले गेले होते. मात्र झाले वेगळेच. 50 वर्षांचे सोडा, गेल्या दोन वर्षात शहराची होते नव्हती अशी अवस्था झाली आहे. पहिलेच शहर चांगले अशी भावना लोकांमधून व्यक्त होत आहे. अमृत अटल पेयजल योजनेचे काम 80 टक्के होवून पूर्णत्वाकडे गेले असले तरी दोनवेळा टेस्टींग फेल गेली आहे. तर भूयारी गटारीचे काम केवळ 5 टक्के झाले आहे. हे काम पुढे पाठ,मागे सपाट अशा पध्दतीने झाले आहे. काम चालू असताना संबंधित यंत्रणेचा अथवा नगरपालिकेच्या एकाही अधिकार्‍याने कामाच्या गुणवत्तेची तपासणी केली नाही अथवा नगराध्यक्षांनी देखील पाहणी केली नाही. विकास हा शहर भकास करणारा ठरतो की काय, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. या दोन योजनांमुळे विधानसभा गेली. त्यामुळेच नगरपालिका जावू देवू नका, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

 

विधानसभा निवडणूकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड न.प.साठी जयदत्त क्षीरसागरांमुळे झुकते माप दिले होते. साडेचारशे कोटीचा निधी विकास कामांसाठी मंजूर केला होता. त्यामुळे अमृत अटल पेयजल व भुयारी गटार योजनेचा समावेश झाला.अमृत अटल ही योजना 114.63 कोटींची होती. तर भुयारी गटार योना 165.18 कोटींची होती. अमृत अटलला फेबु्रवारी 2017 मध्ये मान्यता मिळाली. ही योजना नोव्हेंबर 2019 मध्ये पूर्ण होवून कार्यान्वीत व्हायला हवी होती. तर भुयारी गटार योजनेला जानेवारी 2018 ला मान्यता भेटली. 12 नोव्ेंबर 2018 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात येवून आढावा घेतला होता. 

सदरील योजना ऑगस्ट 2020 मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते पण या दोन्ही योजना मार्च 2021 उजाडू लागले तरी अपूर्ण आहेत. विधानसभा निवडणूकीपूर्वी हे काम सुरु झाले. दरम्यान नगर परिषदेकडे भुयारी गटार अन् अमृत अटल योजनेचे काम देण्यात आले. प्राधिकरणाचे अभियंता टक्केवारी टक्केवारी घेवून बसले. कामाच्या गुणवत्तेकडे त्यांचे बिलकुल लक्ष नाही. या योजनांमुळे शहराचा विकास तर सोडून द्या, पण विद्रुपीकरण मात्र झाले. या योजनांचा निवडणूकीत क्षीरसागरांना फायदा होण्यापेक्षा तोटाच झाला. रस्त्यांची झालेली चाळणी अन् पावसामुळे लोकांचे झालेले हाल यामध्ये शहरवासियांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यातून जयदत्त क्षीरसागरांचा पराभव झाला. विकास कामांचा फटका बसल्याचे राज्यातील एकमेव उदाहरण असावे. 


 

अमृत अटलचे काम लातूरच्या प्रगती कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. या योजनेचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी पाईपलाईनचे काम पुन्हा नव्याने करण्यात येत आहे. भुयारी गटारचे काम औरंगाबाद येथील इंद्राणी कन्स्ट्रक्शनकडे आहे. 63 कि.मी.पैकी केवळ 5 टक्के काम झाले आहे. इंद्राणी कन्स्ट्रक्शनला जीवन प्राधीकरण, न.प.बीडकडून वारंवार नोटीस देण्यात आली आहे.विकासात अडथळ्याचे राजकारण करण्यात आल्याने योजनांची कामे उशीरा सुरु झाली.मात्र दोन्ही योजनांची कामे ज्या दर्जाची, ज्या क्षमतेने,वेगाने व्हायला हवी होती तशी झाली नाहीत.

अमृत अटलचे काम अंतिम टप्प्यात आहे असे सांगीतले जाते पण प्रथम चाचणीमध्येच अडथळा आला.ज्या क्षमतेने पाणी नळाव्दारे जायला हवे तसे जात नाही. अंकुशनगर भागात जलकुंभ उभारले, त्याच भागात प्रथम चाचणी घेण्यात आली होती. अमृत अटल पेयजल योजनेतंर्गत बीडकरांना कधी पाणी मिळणार हे जीवन प्राधीकरणमधील अधिकारी अथवा बीड न.प.मधील पाणी पुरवठा विभागातील अधिकारी सांगू शकत नाहीत.भुयारी गटार योजनेचे काम तर निव्वळ थुक्याला थूका लावण्यासारखे सुरु आहे. जे ड्रेनेज उभारले गेले ते अनेक ठिकाणी जमिनदोस्त झाले आहेत वरचे झाकण रोडवरचे तेवढेच दिसते. मधील बांधकाम पूर्णत:खचून गेले आहे.

शहरवासियांना ‘गृहीत’ धरण्याची सवय आता तरी सोडा!

नगराध्यक्ष भुषण साहेबांनी गेल्या दहा वर्षात शहरातील नागरिकांना गृहीत धरुन राजकारण केले. आपल्याशिवाय पर्याय नाही या धूंदीत भुषण साहेब असतात. विधानसभेत याच चूकीमुळे लोकांनी पर्याय निवडला, आता न.प.निवडणूकीत शहरातील नागरिकांसमोर दोन पर्याय आहेत. त्यामुळे भुषण साहेबांनी गृहीत धरणे सोडून वास्तवाचे भान ठेवून लोकांची कामे करावीत. वेळकाढूपणाची सवय सोडावी, तरच न.प.मध्ये यश मिळेल अशी भावना क्षीरसागर समर्थक व्यक्त करत आहेत.

जे विधानसभेत झालं तेच न.प.मध्ये होईल!

विधानसभा निवडणूकीत भुयारी अन् अमृत अटल योजनांचे खड्डे खांदण्यात आले.शहरातील मुख्य भाग,मार्गावर रस्ते खड्डयात हरवले. त्यातच पाऊस जोरात बरसला.रस्ताच राहिला नसल्याने लोकांचे प्रचंड हाल झाले. शहरवासियांनी त्याचा झटका मतदानातून दिला.आता तीच परिस्थिती आहे. भुयारी गटार नळ योजनेचे काम अजुन अपूर्ण आहे. न.प.नोव्हेंबरमध्ये आहे. पुन्हा पाऊस आहेच. त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे नगराध्यक्ष भुषण क्षीरसागरांनी वेळकाढूपणाचे राजकारण करु नये. नाही तर फटका बसल्याशिवाय राहणार नाही.

 


 

संदीपभैय्या गुणत्तेसाठी विरोध करा,राजकीय नको!

शहरातील विविध विकासकामांच्या संदर्भात आ.संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या चमूने कायम तक्रारीची भूमिका घेतलेली आहे. कामाच्या गुणवत्तेबद्दल खरे तर त्यांनी विरोध करायला हवा. काम बंद पाडणे म्हणजे विकास कामाला खिळ घालणे. त्यामुळे विकास कामांमध्ये राजकीय विरोध नको. कामाची गुणवत्ता आणि दर्जा राहण्यासाठी आ.क्षीरसागरांनी पूर्वीप्रमाणेच जागरुक राहणे गरजेचे आहे अशी भावनाही जनतेमधून व्यक्त केली जात आहे. 

 


 

जयदत्तअण्णांनीही लक्ष घालावे

शहरातील चालू असलेल्या अमृत अटल आणि भूयारी गटार योजनेमध्ये कामाचा दर्जा रहावा अशा सूचना जयदत्त क्षीरसागरांनी सातत्याने केल्या.मात्र जीवन प्राधीकरणचे अधिकारी आणि कंत्राटदार यांनी अण्णांच्या सूचनांचे पालन कुठेही केलेले नाही.त्यामुळे आता या कामात स्वत: जयदत्तअण्णांचीच लक्ष घालावे, तरच नगरपालिकेपूर्वी कामात काही तरी रिझल्ट मिळेल.नाही तर पहिले पाढे पंच्चावण... अशीच अवस्था होईल.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.