बीड जिल्हयात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान
बीड । वार्ताहर
बीड जिल्हयात काल मध्यरात्रीपासून गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.
गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्हयात सर्वच ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, गारपिट आणि मोठया प्रमाणात अवकाळी पाऊस झाला, पावसाचा जोर आजही दिवसभरही सुरूच होता. अवकाळी पावसाने सर्वच तालुक्यांना झोडपून काढले. यामुळे बहरलेल्या आंब्याचा मोहर उध्वस्त झाला. डाळिंब, पपई, द्राक्षे या फळबागांचे त्याचप्रमाणे ज्वारी, हरभरा, गहू या रब्बी पिकांचेही प्रचंड मोठे नुकसान झाले. काढणीला आलेले हे पीक अक्षरशः भूईसपाट झाले. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने यामुळे हिरावून नेला आहे. अचानक आलेल्या या संकटाने शेतकरी पुर्णपणे कोलमडला आहे. सरकारने या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.
Leave a comment