पाटोदा । वार्ताहर
बीड जिल्ह्याचे भाग्य मोठे आहे. या जिल्ह्यात जी धार्मिक संस्थाने आहेत त्या संस्थान मार्फत भक्तीचा ठेवा जपला जातो. गहिनीनाथ गडावरील भक्तीचा धागा हा सर्वांना बांधून ठेवणारा आहे. जी सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते ती आम्ही करत असतो गडाचा विकास हा कुणाच्या वैयक्तिक विषयाचा नसतो हा श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असतो असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ट्रस्ट संस्थान सद्गुरू वामनभाऊ महाराज यांचा 45 वा पुण्यतिथी महोत्सव शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता या वेळी आसाराम बडे आळंदीकर महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी पालक मंत्री पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे, माजी आ.भीमराव धोंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मठाधिपती महंत विठ्ठल महाराज म्हणाले की, सद्गुरू वामनभाऊ यांचा मोठा शिष्य वर्ग असून दरवर्षी या ठिकाणी जनसागर लोटलेला असतो. अंतकरणातून स्मरण केले तर आजचे मरण उद्या वर जाते. यावर्षी महाप्रसाद म्हणून पॉकेट मधून प्रसाद रुपी आशीर्वाद सर्वांना दिला जात आहे. समाजाने हात पसरण्याची वृत्ती आता सोडली पाहिजे इथे येणारे धार्मिकवृत्तीने येत असतात मात्र राजकीय व्यासपीठावर येताना मात्र वृत्ती बदलते. या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मोठे काम केले आहे.माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले, कोरोनाच्या काळात माझी कुटुंब माझी जबाबदारी घेत असताना आज लाखोंचा जनसागर याठिकाणी उपस्थित राहतो आहे.
चुंबक लोखंडाला आकर्षित करून घेते तसा हा भक्तांचा लोंढा या ठिकाणी आलेला आहे. गडावरील भक्तीचा धागा हा सर्वांना बांधून ठेवणार आहे. जी सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली ती आम्ही केली आहे, गडाचा विकास हा कुणाचा वैयक्तिक विषय नाही हा श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. संत वामन भाऊंच्या संस्कार आणि शिस्त यामुळे नवशक्ती निर्माण झाली आहे. भक्तीचा वापर समाजाला जोडण्यासाठी होतो ही फार मोठी गोष्ट आहे. संत वामनभाऊ यांच्या कृपेने बीड जिल्हा सुजलाम सुफलाम व्हावा, वारकरी संप्रदायाचा वारसा आणि वारसा चालवत असताना समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बीड जिल्हा अध्यात्माच्या श्रीमंतीने नटलेला असून परंपरेने वारी करणारा भक्त बीड जिल्ह्यात येणार्या पिढ्यांसाठी भक्ती आणि शक्ती यांचे दर्शन घडवून आणणारा आहे. मनातले प्रदूषण दूर करण्यासाठी परमेश्वराचे नामस्मरण महत्वाचे आहे. भाव आणि भक्तीचे सुरेल व सुरेख मिश्रण बीड जिल्ह्यात पाहायला मिळते असे सांगून त्यांनी उपस्थित भाविकांना संबोधित केले.
Leave a comment