विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
मुंबई | प्रतिनिधी
अनैसर्गिकरीत्या आलेल्या सरकरचा मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही निर्णय नाही. मराठा आरक्षणाबाबतीत भाजपने जी भूमिका घेतली होती, तीच भूमिका आज सरकार मराठा आरक्षणासंदर्भात घेत नाही. तसेच भाजपा सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देताना भाजपने सामाजिक संतुलन राखले होते, पण ते या सरकारकडून राखल्याचे दिसत नाही अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
भाईदंर येथे भाजप वैद्यकीय आघाडी (प्रकोष्ठ) पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात 'महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण' या विषयावर दरेकरांनी उपस्थितांना संबोधित केले. दरेकर म्हणाले की राज्यातील विकासाचा बोजवारा उडाला असून सामाजिक संतुलन बिघडले आहे. अनैसर्गिकरित्या आलेल्या सरकारमध्ये ताळमेळ राहिलेला नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा अजुन तसाच रेंगाळलेला आहे. सरकार सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षण हायकोर्टात टिकलं तर सुप्रीम कोर्टात टिकवण्याची जबाबदारी कोणाची होती ? सरकारची होती ना.. या आरक्षणासाठी सरकारने कोणते प्रकारचे नियोजन केले, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.
मराठा आरक्षाणा सदंर्भातबोलताना दरेकर म्हणाले की, आरक्षणाच्या निर्णाया संदर्भात सुप्रीम कोर्टात तारीख आली पण तेथे सरकारचे प्रतिनिधीत्व करणारे वकील उपस्थित नव्हते, दस्तावेज न्यायालयात सादर करावे लागतात पण त्यावेळी सरकारकडून योग्य दस्तावेज उपलब्ध झालेली नाही. त्याचवेळी राज्य सरकारची मराठा आरक्षणासंदर्भातील निष्काळजीपणाची भूमिका स्पष्ट झाली असे दरेकर यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षण देत असताना भाजपने सामाजिक संतुलन राखलं होते. ओबीसींच आरक्षण राखून आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. धनगर समाजाला एक हजार कोटी देण्याची भूमिका भाजपाने घेतली होती. मराठा आरक्षण देताना आमच्या सरकारने ओबीसी समाज, धनगर समाजाची काळजी घेतली होती, सामाजिक संतुलन राखलं होत. हीच भुमिका सरकार का घेत का नाही असा सवालही दरेकर यांनी केला.
भाजप आता पर्यंत जनतेसाठी काम करत आलं आहे. भाजप पक्षाला काही मिळतं यापेक्षा मला समाजाला काय द्यायचं या भावनेतून आपण सगळे पक्षासाठी काम करतो. केवळ समाजातून नाही तर महाराष्ट्रातुन, देशातुन चांगला संदेश जात दिला जात आहे अशी भावना त्यावेळी व्यक्त केली असे दरेकर यांनी त्यावेळी सागितले. कोरोनासारख्या संकटाच्या काळात भाजपाच्या वैदयकीय आघाडीने युध्दपातळीवर काम केले. भाजपाच्या माध्यमातून या आघाडीमधील सहभागी डॉक्टर व अन्य पदाधिका-यांनी कोरोनोच्या काळात केलेल्या कामामुळे हजारोंना जीवदान मिळाले या शब्दात दरेकर यांनी आघाडीच्या कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी डॉ. अजित गोपछेडे, डॉ. बाळासाहेब हरपडे, डॉ. स्वप्नील मंत्री, डॉ. उज्ज्वला हाके, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. मेघना चौघुले, डॉ. अनुप मगर, डॉ. विकी, डॉ. गोविंद भताने आदि मान्यवर उपस्थित होते.
Leave a comment