सायंकाळी सातपर्यंत १८ हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे तर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ येथे शुभारंभ करण्यात आला. बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला. आज सायंकाळी सात वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. सुमारे १८ हजार ३३८ हून अधिक (सुमारे ६४ टक्के)कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. काही ठिकाणी सायंकाळी सातनंतरही लसीकरण सुरू होते. लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षीत असा प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
पालकमंत्री अस्लम शेख यांच्याहस्ते जे.जे. रुग्णालयात लसीकरणाचा शुभारंभ
दरम्यान, आज मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते जे.जे. रुग्णालयातील लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अमीन पटेल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.
राज्यात सकाळी ११ वाजेनंतर लसीकरणाला सुरूवात झाली. ज्या ठिकाणी कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचण आली तेथे मॅन्युअल नोंदणीसाठी केंद्र शासनाने परवानगी दिली. बऱ्याच ठिकाणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लाभार्थ्यांची नोंदणी झाली. एकंदरीतच लस घेण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले. केंद्र शासनाशी कोविन ॲप संदर्भात चर्चा झाल्यानंतर लसीकरणाचे पुढील सत्र सोमवारी किंवा मंगळवारी घेतले जाईल, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
राष्ट्र आणि राज्यस्तरावरील शुभारंभानंतर जिल्ह्यांमध्ये लसीकरणाला सुरूवात झाली. सातारा येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कराड येथे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, औरंगाबाद येथे पालकमंत्री सुभाष देसाई, जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नागपूर येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, लातूर येथे पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, यवतमाळ-दारव्हा येथे पालकमंत्री संजय राठोड, कोल्हापूर येथे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर,रायगड-अलिबाग येथे पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ झाला.
*सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी) :* अकोला (२३८), अमरावती (४४०), बुलढाणा (५७५), वाशीम (१६७), यवतमाळ (३०७), औरंगाबाद (६४७), हिंगोली (२००), जालना (२८७), परभणी (३७१), कोल्हापूर (५७०), रत्नागिरी (२७०), सांगली (४५६), सिंधुदूर्ग (१६५), बीड (४५१), लातूर (३७९), नांदेड (२६२), उस्मानाबाद (२१३), मुंबई (६६०), मुंबई उपनगर (१२६६), भंडारा (२६५), चंद्रपूर (३३१), गडचिरोली (२१७), गोंदिया (२१३), नागपूर (७७६), वर्धा (३४४), अहमदनगर (७८६), धुळे (३८९), जळगाव (४४३), नंदुरबार (२६५), नाशिक (७४५), पुणे (१७९५), सातारा (६१४), सोलापूर (९९२), पालघर (२५७), ठाणे (१७४०), रायगड (२६७)
Leave a comment