ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यातील कार्यअहवाल
सादर करत अबाधित ठेवली परंपरा
मुंबई । वार्ताहर
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून दर महिन्याला आपल्या कार्याचा अहवाल सादर करण्याची परंपरा सुरू केली. ही परंपरा अबाधित राखत त्यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर-2020 या कालावधीत केलेल्या कामकाजाचा आढावा अहवाल स्वरूपात खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खा. सुप्रियाताई सुळे यांच्यासह अन्य पक्षश्रेष्ठींना सादर केला आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंट येथे गुरुवारी (दि. 07) रोजी खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत ना.धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागात तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेल्या एक वर्षात केलेल्या कामकाजाचा आढावा सादर केला आहे. याचबरोबर दर महिन्याला कार्य अहवाल सादर करण्याची परंपरा अबाधित ठेवत ना. मुंडे यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यातील कामकाजाचा आढावा 44 पानी अहवाल स्वरूपात पक्षश्रेष्ठी व राज्याच्या जनतेसमोर सादर केला आहे.या तीन महिन्यांच्या कालावधीत वाड्या-वस्त्यांची जातीवाचक नावे रद्द करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी घेतला; त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून क्सरण्यासाठी नव्याने निमार्ण केलेला महाशरद हा डिजिटल प्लॅटफॉर्म, ई-बार्टी हे मोबाईल अँप या सर्व निर्णयांची माहिती या अहवालाद्वारे देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात ई-पीक पाहणी सारखी अद्ययावत ऑनलाईन यंत्रणा उभारणी, जिल्ह्यातील विविध विषयी घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठका, त्याद्वारे घेतलेले निर्णय यांचीही माहिती या अहवालात समाविष्ट करण्यात आली आहे. गेल्या एक वर्षात धनंजय मुंडे यांनी केलेल्या कामाचा अहवाल दर महिन्याला सादर करून नव्याने सुरू केलेली ही अभिनव परंपरा अबाधित राखली आहे. त्यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांचा कार्यहवाल खा. शरदचंद्रजी पवार, पक्षश्रेष्ठी तसेच राज्यातील जनतेसमोर सादर केला आहे.
Leave a comment