बीड तालुक्यातील घटना: आरोपी फरार; मुलीवर उपचार सुरु
बीड । वार्ताहर
माझ्याशी बोलत का नाही अशी कुरापत काढून एका अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तलवारीने सपासप वार केल्याची घटना शुक्रवारी (दि.1) समोर आली. तलवारीचे वार झाल्याने मुलगी गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिच्या जवाबावरुन आरोपीविरुध्द बीड ग्रामीण ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार,पोपट बोबडे (27, रा. महालक्ष्मी चौक, रामनगर, ता.बीड) असे आरोपीचे नाव आहे. गतवर्षी पीडित 17 वर्षीय मुलीची ओळख पोपटसोबत झाली होती. पोपट हा तिच्याशी मोबाइलवर बोलत असे. दरम्यान, एप्रिल 2020 मध्ये पोपट बोबडे अचानक तिच्या घरी गेला. यामुळे कुटुंबियांनी मुलीला जाब विचारला. तो घरी आल्यामुळे तिने ’तू येते का आला?’ अशी विचारणा करत त्याच्याशी बोलणे बंद केले होते. दरम्यान आठवडाभरापूर्वी आई आजारी असल्याने पीडित मुलगी गावी आली होती.
दरम्यान बुधवारी सायंकाळी सात वाजता तिचे आई-वडील किराणा आणण्यासाठी गेले होते. पीडित मुलगी तोंड धुण्यासाठी घराबाहेर आल्यानंतर पोपट बोबडे याने पाठीमागून येऊन अचानक तिच्यावर तलवारीने हल्ला केला; मात्र हा वार तिने हातावर झेलला. त्यानंतर ती खाली कोसळली. ’माझ्याशी का बोलत नाही,’ असे म्हणत पोपटने पुन्हा तिच्यावर दोन वार केले. यानंतर तो तेथून पसार झाला. हल्ल्यात पीडितेच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. कुटुंबियांनी मुलीला तातडीने बीडला हलविले. खासगी दवाखान्यात तिच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून उपचार सुरु आहेत. गुरुवारी तिच्या जवाबावरुन बीड ग्रामीण ठाण्यात पोपट बोबडेवर विविध कलमान्वये गुन्हा नोंद झाला. सहायक निरीक्षक योगेश उबाळे तपास करत आहेत.
Leave a comment