उत्पादन शुल्क विभागाची तक्रारीनंतर गुन्हा दाखल
बीड । वार्ताहर
बनावट कागदपत्रे तयार करुन पूर्वीच्या भागीदाराचे नाव वगळून स्वत:च्या नावे देशी दारु दुकानाचा परवाना मिळविल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.1) बीडमध्ये समोर आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यक निरीक्षकांच्या फिर्यादीनंतर एकावर फसवणुकीचा गुन्हा शिवाजीनगर ठाण्यात नोंद झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, भास्कर वेंकटय्या कोटागिरी (रा.चिन्नागुंडाबेल्ली जि. सिध्दीपेठ, तेलंगणा) असे आरोपीचे नाव आहे. देशी दारु विके्रत्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवाना नुतनीकरण करावे लागते. भास्कर कोटागिरी याने 10 डिसेंबर रोजी बनावट कागदपत्रे तयार करुन वसंताबाई मल्ला रेड्डी यांचे दुकानाच्या भागीदारीतील नाव कमी करुन स्वत:चे नावे देशी दारु विक्रीचा परवाना मिळविला. ही बाब निदर्शनास येताच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांनी शिवाजीनगर ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली. त्यावरुन भास्कर कोटागिरीविरुध्द फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा नोंद झाला. पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे हे तपास करत आहेत.
Leave a comment